अमरावतीत पाच लाखांच्या लाचप्रकरणी विभागीय वनअधिकाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:04 PM2020-09-10T17:04:10+5:302020-09-10T17:05:51+5:30
पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सामाजिक वनीकरणच्या विभागीय वनाधिकाऱ्याला विभागाने बुधवारी अटक केली. राजेंद्र गणेश बोंडे (५७, रा. मोर्शी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या उपवनसंरक्षकाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सामाजिक वनीकरणच्या विभागीय वनाधिकाऱ्याला विभागाने बुधवारी अटक केली. राजेंद्र गणेश बोंडे (५७, रा. मोर्शी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या उपवनसंरक्षकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वरूड येथील सामाजिक वनीकरण विभागात वनक्षेत्र अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार दिल्याप्रकरणी मोबदला म्हणून उपवनसंरक्षक राजेंद्र बोंडे याने तक्रारदाराला १६ जुलै २०२० रोजी पाच लाखांची मागणी केली होती. तक्रारदाराने या प्रकाराची तक्रार अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. उपवनसंरक्षक बोंडेला पाच लाखांपैकी अडीच लाख रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे निश्चित झाले.
१० सप्टेंबर रोजी स्थानिक कांतानगर येथील व्हीनस पार्क या त्यांच्या निवासस्थानी ही रक्कम देण्यात आली. सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेच्या रकमेसह उपवनसंरक्षक बोंडेला ताब्यात घेण्यात आले. गाडगेनगर पोलीस ठाण्यात डीएफओ बोंडेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक गजानन पडघन, जमादार चंद्रशेखर दहीकर, पोलीस शिपाई सुनील वराडे, अभय वाघ, वाहनचालक चंद्रकांत जनबंधू यांनी केली.