अमरावतीत होणार शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे विभागीय कार्यालय
By उज्वल भालेकर | Published: July 14, 2024 07:28 PM2024-07-14T19:28:12+5:302024-07-14T19:28:20+5:30
इमारत बांधकामासाठी १७१.९८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला शासनाची मंजुरी
अमरावती: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे या संस्थेच्या अधिनस्त अमरावती विभागीय कार्यालय अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी, तसेच आवश्यक मुला-मुलींचे वेगवेगळे वसतिगृह आणि अभ्यासिकेचे इमारतीच्या बांधकामाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. या बांधकामासाठी अंदाजित १७१.९८ कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे.
शहरातील नवसारी परिसरात शासकीय जागेवर या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या लक्षीत गटातील लाभार्थ्यांना अभ्यासिका, मुला-मुलींचे वेगवेगळे वसतिगृह, अभ्यासिका इमारतीच्या बांधकाम संदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. या बांधकामासाठी मौजा नवसारी येथील सर्व्हे न.२९ मधील १.४४ हे. आर व सर्व्हे नं.१३३ मधील ०.८१ हे. आर असे एकूण २.२५ हे. आर पैकी २.२४ शासकीय जमीन ही नियोजन विभागास सारथी संस्थेकरिता देण्यात आली आहे.
येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे विभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक १७१.९८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने सारथीच्या मार्फत शासनाला पाठविले होते. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता देण्याबाबतचा निर्णय शासन विचाराधीन होता. अखेर ९ जुलै रोजी शासनाने या इमारत बांधकामाला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जारी केला आहे. या विभागीय कार्यालयामुळे जिल्ह्यासह अमरावती विभागातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील मुला-मुलींना याचा लाभ मिळणार आहे.