‘धन’लक्ष्मीच्या लालसेतून घुबड, दुतोंडे साप संकटात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 10:46 AM2017-10-20T10:46:41+5:302017-10-20T10:51:50+5:30
ऑनलाईन लोकमत
अमरावती : धनलाभाच्या लालसेतून दिवाळीच्या आसपास घुबड आणि दुतोंड्या सापाचा बळी देण्याची कुप्रथा आहे. नरक चतुदर्शीच्या मध्यरात्रीपासून अशा प्रकारांमध्ये वाढ होते. तेव्हा घुबड व दुतोंड्या सापावर संकट ओढवण्याची शक्यता बघता वन्यप्रेमी सतर्क झाले आहेत.
दिवाळी उत्साहात साजरा केला जात असताना तथाकथित मांत्रिक मात्र धनप्राप्तीसाठी अघोरी मार्ग चोखाळतात. लक्ष्मीचे वाहन असलेले पांढरे घुबड व दुतोंड्या सापालाही बळी देण्याच्या नावाखाली ठार केले जाते. हा प्रकार थांबविण्यासाठी ‘वसा’चे पदाधिकारी प्रयत्नरत असून, या वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी सतर्क राहा, असे आवाहन सर्पमित्र गणेश अकर्ते, शुभम सांयके, मनोज बिंड यांनी केले आहे.
जिल्ह्यात घुबडांच्या १४ विविध प्रजाती आढळून येतात. मांत्रिक शक्यतो मोठ्या आकाराचे घुबड पकडतात. त्यासाठी दिवाळीपूर्वीच गावखेड्यातील नदी-नाल्यांचा परिसर, उंच व जुने झाड, बंद पडलेल्या घरांची निगराणी केली जाते. असा प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी वसाच्या पदाधिकाºयांशी संपर्क करावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.