दिवाळी गेली अंधारात; विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर शेतकऱ्याने उगारली खुर्ची
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 11:32 AM2023-11-21T11:32:59+5:302023-11-21T11:35:22+5:30
पोलिसांसोबत झाला वाद, तातडीने पीकविमा देण्याची केली मागणी
अमरावती : यंदा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून याला कृषी विभाग आणि पीकविमा कंपनी जबाबदार असल्याचा अरोप करत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी आंदोलन केले. यावेळी एका संतप्त शेतकऱ्याने पोलिसांसमोरच पीकविमा कंपनीच्या प्रतीनिधीवर खुर्ची उगारल्याने पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेत, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकविकास संघटनेने दिला आहे.
जिल्ह्यातील सुमारे ३ हजार १५६ फळबाग शेतकरी संकटात सापडला असून त्यांची दिवाळी ही कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीमुळे अंधारात गेल्याचे लोकविकास संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी कृषी अधिकारी यांच्या दालनात शेतकऱ्यांनी स्वतःला अधिकारी व पीक विमा कंपनी प्रतिनिधींना तब्बल दीड तास कोंडून घेतले. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, अशी भूमिकाच आंदोलनकर्त्यांनी यावेळी घेतली होती. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता बघता याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
या दरम्यान पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा सुरू असतानाच एका संतप्त शेतकऱ्याने प्रतिनिधी खोटा बोलत असल्याचे सांगत त्यावर खुर्ची उगारली. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडल्याने पोलिसांनी तातडीने प्रतिनिधीचा बचाव केला. त्यामुळे यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला होता. आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकविकास संघटनेच्या वतीने कृषी विभागासह पीकविमा कंपनीला देण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात रमण लंगोटे, नियाज अली, प्रवीण लंगोटे, विजय भुले आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.