मेळघाटातील 'वारली पेंटिंग' सातासमुद्रापार; २८ देशांच्या दूतावासांकडे शुभेच्छापत्रे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 06:04 PM2021-11-01T18:04:30+5:302021-11-01T18:07:20+5:30
दिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. त्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश देत ही शुभेच्छापत्रे पोस्टाद्वारे साता समुद्रापार २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आहेत.
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे
अमरावती : शिक्षकांना विषय सुचला, आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात कुंचला दिला नि महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग कागदावर चितारण्यात आली. इवल्याशा हातांनी साकारलेली दिवाळीची शुभेच्छापत्रे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते गावातील सरपंचपासून थेट सातासमुद्रापार अमेरिकासारख्या देशातील मान्यवरांना त्या-त्या देशांच्या दूतावासामार्फत मेळघाटातून पाठवली जात आहेत.
चिखलदरा तालुक्याच्या जैतादेही येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. पोस्टाद्वारे ही शुभेच्छापत्रे २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आहेत. या शाळेने यापूर्वीसुद्धा राज्यस्तरावर मग्रारोहयो अंतर्गत परसबाग, फळबाग व जैवविविधता हा अभिनव उपक्रम राबविला होता. पुन्हा या शाळेने दिवाळीनिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना शुभेच्छापत्रे बनविणे शिकवून त्यात भर घातली. शिक्षक गणेश जामूनकर, जितेंद्र राठी, शुभांगी येवले यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण ८७ विद्यार्थ्यांच्या हाताने हे कार्य केले आहे. इतरही विद्यार्थ्यांना हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.
वारली पेंटिंग महाराष्ट्राची ओळख
दिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. त्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश देत पोस्टाद्वारे साता समुद्रापार महाराष्ट्राची ओळख पाठविली गेली आहे.
शाळेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. तिन्ही शिक्षकांनी हा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले आणि आदिवासी चिमुकला विद्यार्थ्यांकडून वारली पेंटिंग शुभेच्छापत्रे तयार करून ती आता देशाचे पंतप्रधान सातासमुद्रापार व मान्यवरांना पोस्टद्वारे पाठविला जात आहेत.
- गणेश जामूनकर, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, जैतादेही, ता. चिखलदरा