हार्डवर्क करा, गुन्हे घडता कामा नये !
By admin | Published: June 9, 2016 12:22 AM2016-06-09T00:22:50+5:302016-06-09T00:22:50+5:30
पोलिसांनी हार्डवर्क करायलाच हवे, हॉटेल, लॉज, धाबे व हातगाड्या ही ठिकाणे गुन्हेगारांचे आश्रयस्थाने आहेत.
सीपींच्या कडक सूचना : दररोज तासभर पोलिसांशी संवाद
अमरावती : पोलिसांनी हार्डवर्क करायलाच हवे, हॉटेल, लॉज, धाबे व हातगाड्या ही ठिकाणे गुन्हेगारांचे आश्रयस्थाने आहेत. यासर्व ठिकाणांची तपासणी करून गुन्हेगारांवर वॉच ठेवा, गुन्हे घडता कामा नयेत. लोकांच्या तक्रारी माझापर्यंत येत आहेत, अशा सक्त सूचना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना वायरलेसवर दिल्यात. पोलीस आयुक्त थेट संवादातून पोलिसांची चाचपणी करीत आहेत.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पदभार सांभाळल्यापासून गुन्हेगारीसंदर्भात आढावा घेतला. गुन्हेगारीचा आलेख व वाहतूक नियंत्रणासंदर्भात अभ्यास केल्यावर त्यांना गुन्हेगारी वाढल्याचे निदर्शनास आले होते. नागरिकांसह विविध संघटनांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि पत्रकारांशी संवाद साधताना लक्षात आलेल्या समस्यांवर पोलीस आयुक्तांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार त्यांनी नियोजनास सुरूवात केली. दरम्यान काही पोलीस कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम पोलिसांनाच शिस्त लावण्याचे काम हाती घेतले. पोलीस आयुक्तांनी विविध शाखेच्या पोलिसांना आयुक्तालयात बोलावून त्यांची कानउघाडणी सुरु केली. त्यांच्या कामाचा आराखडा तयार करून त्यानुसार फेरबदल सुरु केले. दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. सद्यस्थितीत वायरलेसवरूनच ते कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत. मंगळवारी सायंकाळी वायरलेसवर ‘व्हिक्टर कॉलिंग’ झाले. नि:शब्द होऊन कर्मचारी पोलीस आयुक्तांच्या सूचना ऐकू लागले. सीपींच्या या कार्यशैलीचे नागरिक कौतुक करीत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी हे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अवैध धंदे सुरु असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित ठाणेदारांची खैर नाही, अशा सूचना सीपींनी दिल्या आहेत.