बिबट्याला घाबरु नका, संयम पाळा
By Admin | Published: April 2, 2015 12:27 AM2015-04-02T00:27:13+5:302015-04-02T00:27:13+5:30
नागरी वस्तींच्या विस्तारामुळे बिबट्यांच्या अधिवासात अडथळा निर्माण झाला आहे.
अमरावती: नागरी वस्तींच्या विस्तारामुळे बिबट्यांच्या अधिवासात अडथळा निर्माण झाला आहे. बिबट नागरी वस्तीत आला नसून नागरीकच त्यांच्या अधिवासात गेले आहे. बिबट मांजर प्रजातीचा असून त्याला मानवी वस्तीजवळ राहण्याची सवयच आहे. त्यामुळे बिबट्याला न घाबरत थोडा संयम पाळा, आक्रमक होऊ नका, असे, आवाहन मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनी केले.
जंगलातील खासगी क्षेत्रात नागरी वस्ती दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे जंगलाला चारही बाजूने नागरी वस्तीचा वेढा निर्माण झाला आहे. जंगलात राहणारे वन्यजीव जगंलाबाहेर आल्यास ते सरळ मानवी वस्तीत येत असल्याचे आढळून येत आहे. बिबट्याला नागरिक वस्तीत सहजरित्या खाद्य उपलब्ध होत असून त्यांच्यासाठी ते वातावरण पोषक ठरत आहे. त्यातच बिबटची मानवी वस्तीजवळ राहण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे तो मानवी वस्तीच्या आजुबाजुला अधिवासात राहतो. हळूहळू नागरी वस्तीचा विस्तार जंगल भागाकडे होत आहे. त्यामुळे बिबट्यांचे दिसणे साहजिकच आहे. हळूहळू नागरीक जगंलाच्या अधिवासात जात असल्याने वन्यप्राणी दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थीती मानवामुळेच उदभवली आहे, असे मत मुख्यवनसंरक्षक गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले. एसआरपीएफ कॅम्प परिसरात डुक्कर व श्वान सारखे भक्षक जवळच उपलब्ध होत असल्यामुळे बिबट तेथे वास्तव्यास आले. मात्र, घाबरुन न जात सुरक्षेसाठी जगंलाजवळील परिसरात सकाळी व सायंकाळी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहन गौड यांनी केले आहे.
रात्री १२.३० ला
बिबट कॅमेऱ्यात कैद
वनविभागाच्या शिकारी प्रतिबंधक विभागाने एसआरपीएफ कॅम्प परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मंगळवारी रात्री १२.३० वाजता बिबट कैद झाला. बिबट्याने नाल्याजवळील परिसरात फेरफटका मारल्यावर तेथून निघून गेल्याचे कॅमेऱ्यांत कैद झाले आहे. दोन दिवसांपासून बिबटाचा वावर कमी झाल्याचे वनविभागाचा निदर्शनास आले.