वृक्ष तोडू नका, चिमुकल्यांची आर्जव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:08 PM2017-12-22T23:08:43+5:302017-12-22T23:09:56+5:30
शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळपास ३५ हिरव्या वृक्षांना कापू नये, असी आर्जव चिमुकल्यांनी वृक्षांना मिठी मारत केली.
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळपास ३५ हिरव्या वृक्षांना कापू नये, असी आर्जव चिमुकल्यांनी वृक्षांना मिठी मारत केली. रस्ता चौपदरीकरणासाठी कंत्राटदाराने नगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन उभारले जात असून, त्यात बालकांचा सहभाग आहे.
परतवाडा-अमरावती मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी ६० पेक्षा अधिक वृक्ष कापण्यात आले होते. आता पुन्हा अकोला-इंदूर महामार्गाला जोडण्यासाठी परतवाडा शहरातील ३५ वृक्ष कापण्याची परवानगी मागण्यात आली आहे. शहरातील झाडे कापू नये, यासाठी आदिवासी पर्यावरण संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छडले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. शाळांमधून वृक्षांचे फायदे गिरविले जात असल्यामुळे शहरातील पर्यावरण सामाजिक संस्थेसह चिमुकल्यांनी आपल्या इवल्याश्या हातात महाकाय वृक्ष कवेत घेत ते कापू नका, अशी विनवणी केली. यामध्ये निर्भय खांझोडे, श्रुतिका डोंगर, संजित प्रजापती, समीर शहा, रजा खान या चिमुकल्यांचा सहभाग होता. संघटनेचे योगेश खानझोडे, प्रदीप चांदूरकर, सुरेश प्रजापती, मनिराम चिलाटी, बाबाराव बेठे, किसान जामकर, ममता डहाके आदींनी एसडीपीओंसह नगरपालिकेला निवेदन दिले.
आधी वृक्षारोपण करा
शासनाच्या विकासकामात अडथळा ठरणाऱ्यां झाडांची कापणी ठरलेली असल्याचे मत अधिकाºयांनी व्यक्त केले. तथापि, एक झाड कापल्यावर त्याऐवजी दहा वृक्ष लावा व साडेतीनशे वृक्षरोपण करा. त्याच्या संवधार्नाची जबाबदारी पूर्णपणे संबधित वृक्षतोड करणाऱ्यांनी घ्यावी आणि तसे लेखी द्यावे, अशी मागणी मान्य असेल, तरच वृक्षतोडीची परवानगी प्रशासनाने द्यावी, अन्यथा कुठल्याही परिस्थिती वृक्षतोड होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
आवाज कोण ऐकणार!
गुरुवारी परतवाडा शहरातील आठवडी बाजार असतो. त्यामुळे शहरात ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिक येतात. अशात अंजनगाव ते बैतुल स्टॉपवरील झाडांना चिमुकल्यांनी आपल्या कवेत घेतल्याचे चित्र रस्त्याने ये-जा करणाºयांसाठी कौतुकाचा विषय ठरले होते. मात्र, त्यांची ही कळकळ प्रशासन ऐकेल का, हे आज तरी अनुत्तरित आहे.
वृक्षतोड परवानगी नाकारावी, अशी आमची मागणी आहे. प्रत्येक झाडाच्या मोबदल्यात दहा झाडे लावण्यात यावी. तसे लेखी लिहून घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
- योगेश खानझोडे
अध्यक्ष, आदिवासी पर्यावरण संघटना, परतवाडा