दिरंगाई नकोच, यंत्रणांचे सहकार्य महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:25 PM2018-02-13T22:25:55+5:302018-02-13T22:27:26+5:30
‘मागेल त्याला शेततळे’ ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. हा उपक्रम खारपाणपट्यासाठी मोठी उपलब्धी ठरत असल्याने या कामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, ....
आॅनलाईन लोकमत
अमरावती : .‘मागेल त्याला शेततळे’ ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. हा उपक्रम खारपाणपट्यासाठी मोठी उपलब्धी ठरत असल्याने या कामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत ३१ मार्चपावेतो लक्ष्यांकपूर्तीचा जिल्ह्याचा दृढनिश्चय असल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केली.
या योजनेची कामे करण्यासाठी केवळ चार महिन्यांचा अवधी मिळतो. या अवधीत अधिकाधिक कामे करण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी ३० जून ही डेडलाइन असली तरी त्यापूर्वी ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण व्हावीत, यासाठी आपले प्रयत्न आहे. महसूल व कृषी विभागाच्या समन्वयातून कामे त्वरित करा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील काही तालुक्यात योजनेचे काम माघारल्याची बाब जिल्हा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी गंभिरतेने घेत दर्यापूर, अंजनगाव सुर्जी भातकुली, अचलपूर व भातकुली या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वेतनवाढ तात्पुरत्या रोखण्याचे पत्र तर अन्य नऊ तालुक्यांतील कृषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने कृषी विभागात हडकंप माजला. जिल्हा प्रशासनाद्वारा खारपाणपट्यातील प्रत्येक कृषी सहायकाला ५०, तर उर्वरित भागातील प्रत्येक कृषी सहायकाला २५ शेततळ्यांचे लक्ष्यांक देण्यात आलेले आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात ४५०० शेततळ्यांचे लक्ष्यांक आहे. यातुलनेत ६,२२० अर्ज प्राप्त झाले. यापैकी ६,२१४ अर्जाचे सेवा शुल्क भरण्यात आले व ४,१८४ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. ४,१३६ शेततळ्यांच्या कामांसाठी आखणी करून देण्यात आलेली आहे.
हा आहे कृषी अधिकाऱ्यांवर ठपका
शासनाच्या १० आॅक्टोबर २०१६ चे निर्देशानुसार उपक्रमाचे निर्धारित लक्ष्यांक दिलेले आहे व या कामांना प्रशासकीय मंजुरीदेखील प्रदान केली आहे. त्यातुलनेत शेततळ्यांची कामे सुरू नाहीत. याअनुषंगाने तालुकास्तरीय समितीचे सचिव म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची व वेळोवेळी आयोजित बैठकीत दिलेल्या आदेशांची अवहेलना आहे. ही गंभीर बाब आहे. शासनाचे १९ मार्च २०१६ च्या निर्र्णयान्वये जिल्हाधिकारी विभागप्रमुख घोषित केले आहे. याच अधिकाराच्या वापराने त्यांनी तात्पुरती कारवाई प्रस्तावित केली आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी व लोकोपयोगी उपक्रम आहे. यामध्ये दिरंगाई नकोच. यंत्रणांच्या समन्वयातून कामे व्हावीत, यावर आपला भर आहे.
- अभिजित बांगर,
जिल्हाधिकारी