स्वागताला हार, बुके नकोत; रोपटे अन् गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना साहित्य द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 11:09 AM2024-08-06T11:09:38+5:302024-08-06T11:13:53+5:30
Amravati : सीईओ संजीता मोहपात्रा यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वागताला हार-तुऱ्यांऐवजी रोपटे किंवा शालेय साहित्य देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी केले आहे. त्यांनी दालनाबाहेर यासंदर्भात लावलेली सूचना लक्षवेधी ठरत असून त्यांच्या या उपक्रमास सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे मुलांना शालेय साहित्याची मदत देणे गरजेचे आहे. त्या भूमिकेतूनच नोटबुक, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स असे साहित्य द्यावे, असे आवाहन केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्याचीही आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वागताला येणाऱ्या प्रत्येकाने हार, बुके याऐवजी रोपटे आणल्यास अधिक बरे. दरम्यान, सीईओंच्या या आवाहनाला अनुसरून त्यांना भेटण्यास येणारा प्रत्येकजण या सूचनेचे पालन करत आहे.
"जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा उद्देश समोर ठेवून ही संकल्पना मांडली. या उपक्रमास नागरिकांचा व अभ्यागतांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे."
- संजीता मोहपात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती
इमारतींची डागडुजी सुरू
जिल्हा परिषदेच्या काही शाळा इमारतीचे बांधकामही नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने शासकीय निधीतून डागडुजीची सोय केली आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. जि. प. कर्मचारी संघटनेने सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करीत शालेय साहित्याची मदत करावी, अशा सूचना दिल्या आहेत.