प्यायलाच पाणी नाही, तेथे फिल्टर करणार काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:23 PM2017-08-03T23:23:18+5:302017-08-03T23:23:50+5:30
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर १० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असताना त्यावर साधा ब्र काढायला पांढरपेशांना वेळ नाही.
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर १० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असताना त्यावर साधा ब्र काढायला पांढरपेशांना वेळ नाही. दुसरीकडे जलशुद्धीकरणासाठी शासनाने तीन कोटी ६० लक्ष रुपये मंजूर केले. मात्र पाणीच नाही तेथे कुणाला फिल्टर करायचे म्हणायची वेळ आली आहे.
चिखलदरा शहराला अनेक वर्षांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सतत लावून धरले. त्यावर ३ महिन्यांपूर्वी ३ कोटी ५९ लक्ष रुपये खर्चून जलशुद्धीकरण, साडेपाच किलोमीटर लांबीची गावातील जुनी पाईपलाईन काढून ९० ते ११० मि.मी. व्यासाची पाईपलाईन आदी कामे केली जाणार आहेत. कालापाणी तलावावर जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जाणार आहे. मात्र शहराला पाणीपुरवठा करणारे सक्कर तलाव आणि काला पाणी या दोन्ही साठवण तलावांची अवस्था पालथ्या घागरीवर पाणी टाकण्यासारखी आहे. पावसाच्या पाण्यामुळे तलाव एकीकडे भरत असताना दुसरीकडे दोन्ही तलावांना असलेले लिकेजमुळे ते रिकामे होतात. परिणामी जलशुद्धीकरण केंद्र तयार होत असल्याची आनंददायी बाब असताना पाणीच नाही. तेथे कुणाला फिल्टर करणार, असा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी चिखलदरा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने त्यावर लक्ष देण्याची गरज आहे.
विस्तारीकरणाची गरज
राज्यभर कोट्यवधी रुपयांच्या नितून जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहे. चिखलदºयातील सक्कर तलाव आणि कालापाणी तलावाच्या पाणी गळतीसोबत विस्तारीकरणाची तत्काळ गरज आहे. पावसाळ्यातच या दोन्ही तलावाचे विस्तारीकरण जलयुक्त शिवारातून झाल्यास पाणी साठ्यात वाढत होणार आहे. मात्र हे करायला स्थानिय प्रशासन, नगरपरिषद, लोकप्रतिनिधी आदींचे वेळकाढू धोरण, विदर्भाच्या नंदनवनाची पाणी समस्या दूर करणार का, हे आज तरी अनुत्तरित आहे.
जलशुद्धीकरणासाठी ३ कोटी ५९ लक्ष रुपयांचा निधी आला. त्यात पाईपलाईन आदी कामे असून निविदा अंतिम टप्प्यात आहे. कालापाणी तलावावर केंद्र होणार आहे.
- शरद सिनकर,
उपअभियंता, मजीप्रा, अंजनगाव