‘त्यांच्या’ घरी अजूनही आली नाही ‘उज्ज्वला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:13 PM2018-02-25T23:13:21+5:302018-02-25T23:13:21+5:30
गरीब महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली.
आॅनलाईन लोकमत
तिवसा : गरीब महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. मात्र, तालुक्यातील वऱ्हा येथील एका दिव्यांग व भूमिहीन महिलेने या योजनेचा लाभ मिळण्यासाठी धडपड करूनही व्यर्थ गेल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रतिभा सुरेश उमप (रा.वऱ्हा) असे त्या शेतमजुरी करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिवसा तालुक्यातील अनेक खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. आजही गरीब महिला परंपरागत चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे वास्तव आहे. पूर्वापार चालत असलेल्या चुलीमध्ये ही लाकडे जळतण म्हणून वापरतात. धूर स्वयंपाक घरात कोंडत असल्यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. बीपीएल प्रमाणपत्रासह दहा प्रकारचे दस्तऐवज सादर करून गरीब महिलांना गॅस कनेक्शन मोफत दिले जाते. पण, शेगडी व इतर साहित्यासाठी दोन हजार रुपयापर्यंत रुपये खर्च करावे लागतात. पण, ही लोन प्रक्रिया त्रासदायक असल्याची माहिती आहे. याला काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जात आहे.
गॅस कनेक्शन मोफत देणारी सरकार कितीही गवगवा करीत असली तरी गॅस कनेक्शन घेतेवेळी महिलांना काही रुपये मोजावे लागतात, हे वास्तव आहे. त्यापुढे तर गॅस सिलिंडर घेण्यासाठी पैसा दयावाच लागतो. पावसाळ्यात सरपणासाठी परिसरातील शिवारात जावे लागते. तिवसा तालुक्यात सकाळी निघून लाकूड फाटे जमा करुन डोक्यावर आणणा?्या गरीब महिला आहेत. या महिलांना सरपणासाठी रानात जावे लागत आहे. त्यामुळे हिंस्रपशूंचा मोठा धोका संभवतो.