डॉक्टरांना बदनाम कराल तर याद राखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:23 PM2018-08-31T22:23:31+5:302018-08-31T22:23:56+5:30
शहरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे, खासगी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना डेंग्यूच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा स्थितीत डॉक्टरांचे बळ वाढविण्याऐवजी त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, अशा संतप्त भावना व्यक्त करून अमरावती इंडियन मेडिकल असोसिएशनने या मानसिकतेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे, खासगी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना डेंग्यूच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा स्थितीत डॉक्टरांचे बळ वाढविण्याऐवजी त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, अशा संतप्त भावना व्यक्त करून अमरावती इंडियन मेडिकल असोसिएशनने या मानसिकतेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय पोळी शेकण्याच्या उद्देशाने डॉक्टरांचे केले जाणारे खच्चीकरण आणि चारित्र्यहनन निषेधार्ह आहे. यापुढे राजकीय पोळी शेकण्याकरिता डॉक्टरांचे नाव वापरून बदनाम केल्यास, त्याद्वारे समाजमन कलुषित केल्यास, आम्हाला गृहीत धरल्यास खबरदार! याद राखा - सडेतोड उत्तर देण्यास आम्हीही सक्षम आहोत, असा इशाराही आयएमएने दिला आहे.
कायदेशीर मार्ग अवलंबावे
रूग्णालय वा डॉक्टरांविषयी कुणाला काही तक्रार असल्यास ग्राहक मंच, आय.एम.ए., मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. तथापि स्वत: न्यायाधीश बनून समाज व डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या धाग्यांची वीण उसविणे कितपत योग्य, असा सवालही आयएमएच्या सभेत उपस्थित करण्यात आला.
केसपेपर्स देऊच, तुमच्याकडे
आहेत काय तज्ज्ञ डॉक्टर ?
स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून डॉक्टरांची मुस्कटदाबी करण्याचा निंदनीय प्रकार सुरू झालेला आहे. महानगर पालिका प्रशासनाने सर्व रूग्णालयांना काही महिन्यांपासून रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या डेंग्यूच्या रूग्णांचे तपासणी रिपोर्ट व इस्पितळातील कागदपत्रे मागवण्याची प्रक्रिया सुरू केली. माध्यमांतून तशी वृत्ते प्रसिद्ध झाली. हवे ते केसपेपर्स देण्यास आमची ना नाही; परंतु रुग्णांना बघितल्याशिवाय केवळ केसपेपर्सवरून निर्णायक मत नोंदविणारे उच्चविद्याविभूषित डॉक्टर महापालिकेकडे उपलब्ध आहेत काय, असा सवाल आयएमएने महापालिकेला केला आहे. तसे डॉक्टर नसतील, तर केसपेपर्स देण्याच्या प्रक्रियेला अर्थ उरतो तरी काय, असाही सूर उमटला.
डॉक्टर व इस्पितळांनी रुग्ण आणि त्यांच्या आजारासंबंधी गोपनियता बाळगणे बंधनकारक आहे. महापालिकेला पुरविण्यात आलेले केसपेर्स लीक झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील, याचेही उत्तर महापालिकेने द्यावे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
का संतापले डॉक्टर्स? काय आहे प्रकरण?
शहरात डेंग्यूचे थैमान आहे. महापालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय चमू नाही. खासगी डॉक्टरांकडे डेंग्यूच्या रुग्णांचा ओघ वाढला आहे. झोपही अशक्य व्हावी इतके डॉक्टर डेंग्यू आणि इतर साथीच्या रुग्णांमध्ये व्यस्त असताना, ज्यांनी डेंग्यू असल्याचे निदान केले, अशा डॉक्टरांचेच केसपेपर महापालिकेने मागविले. त्या केसपेपर्सची तपासणी करून त्यात काही गैर आढळल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेच्या बैठकीत देण्यात आला होता. या कृतीमुळे डॉक्टरांवर अविश्वास तयार झाला आहे. डेंग्यू नसतानाही डेंग्यू असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांची लूट केली जात आहे, असे चित्र उभे केले गेले. प्रामाणिक प्रयत्नांना असे बदनाम केले जात असल्याने डॉक्टरांची संघटना संतप्त झाली आहे.