आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये नवा वाटेकरी नको; विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा
By उज्वल भालेकर | Published: October 16, 2023 05:42 PM2023-10-16T17:42:38+5:302023-10-16T17:43:39+5:30
धनगर आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही मोर्चातून निषेध
अमरावती : आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये आता नवा वाटेकरी नको. धनगर ही जात आहे ती जमात नाही. सरकारने जर धनगरांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला तर आदिवासी पेटून उठेल असा इशाराच सकल आदिवासी संघर्ष समितीने जन आक्रोश मोर्चातून दिला आहे. सोमवारी आदिवासींच्या विविध मागण्यासंदर्भात शहरातील नेहरू मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो आदिवासी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे यासाठी धनगर समाज बांधवांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी धनगर नेते गोपीचंद पडळकर यांची तिवसा येथे आरक्षणाच्या मागणीसाठी जाहीर सभादेखील पार पडली. परंतु आता धनगर आरक्षणाच्या विरोधात राज्यभरातील आदिवासी बांधवदेखील पेटून उठले आहेत. अनुसूचित जमातीच्या साडेसात टक्के हक्काच्या आरक्षणामध्ये इतर कोणाचीही घुसखोरी आदिवासी सहन करणार नाही, असा इशारा देत आदिवासी संघर्ष समितीने जन आक्रोश मोर्चा काढला.
राजकमल चौक येथील नेहरू मैदानातून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येत महिला तसेच युवक सहभागी झाले होते. यावेळी सरकार विरोधी घोषणबाजी करत धनगर आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही मोर्चातून निषेध करण्यात आला. आदिवासींच्या म्हणण्यानुसार धनगर समाज हा अनुसूचित जमातीचे निकष पूर्ण करू शकत नसतानाही आदिवासी बांधवांना वारंवार डिवचण्याचा प्रकार करत आहेत.
धनगर ही जात असून त्यांना भटक्यात जाती एनटीसी मधून ३.५ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे जर अनुसूचित जमातीमध्ये धनगरांची घुसखोरी झाली तर आदिवासी बांधव पेटून उठेल असा इशारा विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व अर्जुन युवनाते, रोहित झाकर्डे, पवन वाढवे, सोम सोळंके, लक्ष्मण सोळंके, कमल उईके, शंकर शिरसाग महेंद्र कोडापे, ऋषिकेश लाव्हरे, पवन सोळंके, पवन चांदेकर, श्रावण उईके, नितीन नामुर्ते, संदीप कुमरे यांनी केले.