नववीच्या विद्यार्थ्यांना नापास करू नका
By admin | Published: December 26, 2015 12:21 AM2015-12-26T00:21:08+5:302015-12-26T00:21:08+5:30
इयत्ता १०वीचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून नववीमधील अनेक विद्यार्थ्यांना जाणून बुजून नापास करण्याचा प्रकार होत आहे.
शिक्षण विभागाचा फतवा : मुख्याध्यापक, शिक्षकांवर जबाबदारी
अमरावती : इयत्ता १०वीचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून नववीमधील अनेक विद्यार्थ्यांना जाणून बुजून नापास करण्याचा प्रकार होत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. परंतु आता अभ्यासक्रमात मागे राहिलेल्या नववीतील मुलांची तयारी करवून घेऊन त्यांना दहावीत प्रवेश देण्याची जबाबदारी शासनाने मुख्याध्यापक - शिक्षकांवर सोपविली आहे. त्यामुळे नववीमधील नापास मुलांची टक्केवारी यापुढे घसरणार आहे.
शाळेचा निकाल उत्तम लागावा म्हणून अनेक संस्थामध्ये नववीमधील विद्यार्थ्यांना नापास केल्या जात असल्याचे प्रकार शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. यासंदर्भात राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीस नववीमधील विद्यार्थ्यांची गळती कमी करण्याचे व कच्या मुलांची तयारी करण्याचे ठरविण्यात आले.
सद्यस्थितीत मुलामुलींचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण २० टक्के आहे. ते प्रमाण ५ टक्क्यावर आणण्याचे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उद्दिष्ट आहे. त्या अंतर्गत शासनाने शिक्षण विभागाद्वारा या विषयीची योजना आखण्यात येणार आहे. नववीत नापास झाल्याने अनेकदा विद्यार्थी शाळा सोडून देतात तर काही विद्यार्थिनी शाळा सोडून देतात. तसेच काही वेळा कच्या मुलांना नापास करुन त्यांना १७ नंबरचा फार्म भरुन दहावीच्या परीक्षेला बसविण्यासाठी काही शाळा हजारो रुपये लाटत आहे. या सर्व प्रकाराला चाप बसावा यासाठी शिक्षण विभागाने ताठर भूमिका घेतली आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांंनी विद्यार्थ्यांचा कच्चा राहिलेला विषय पक्का करुन घ्यावा, अशा सूचना शिक्षण सचिवांनी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
दहावीप्रमाणे नववीच्याही मुलांचे मूल्यमापन
अनेक शाळा दहावीच्या निकाल १०० टक्के लागावा यासाठी किमान २० टक्के विद्यार्थ्यांना नववीमध्ये नापास करण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे मुलांची गळतीही कमी होत आहे. हे रोखण्यासाठी कच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारी करुन घेऊन ते दहावीत कसे प्रवेश करू शकतील, याची जबाबदारी मुख्याध्यापक व विषय शिक्षकांवर राहणार आहे. कोणताही विद्यार्थी नववीत जाणून बुजुन नापास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. दहावीच्या मूल्यमापन पद्धतीप्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. यापुढे नववीच्या निकालांची पडताळणी शिक्षणाधिकारी करणार आहेत.