भक्तीधागा उसवू नये !
By admin | Published: May 6, 2017 12:04 AM2017-05-06T00:04:23+5:302017-05-06T00:04:23+5:30
अंबादेवीच्या अंगाऱ्यात पाल आढळली. श्रद्धेने, विश्वासाने जेथे मान झुकते-
प्रासंगिक
गणेश देशमुख
अमरावती : अंबादेवीच्या अंगाऱ्यात पाल आढळली. श्रद्धेने, विश्वासाने जेथे मान झुकते- त्या आई अंबेच्या आशीर्वादाचे स्वरूप असलेल्या अंगाऱ्यात विषारी प्राणी, कीटक संचार करीत असतील तर तो भाविकांच्या विश्वासाशी होणारा घातच नव्हे काय?
आई अंबेच्या दर्शनासाठी जाणारे भाविक घरून निघतानाच श्रद्धेच्या सागरात आकंठ डुंबलेले असतात. अंबामाईच्या चरणांशी भाविक माथा टेकतात, त्यावेळी जणू हृदय ओंजळीत ठेवून तेही अर्पण केले जाते! भावनांनी ओथंबलेल्या त्या क्षणी अंगाऱ्याचे महत्त्व अर्थातच अनन्यसाधारण. ज्या वास्तूत आई अंबेचे वास्तव्य आहे, त्या वास्तुबाबत आणि आई अंबेच्या भक्तीप्रक्रियेशी जुळलेल्या हरेक वस्तुबाबत पवित्रतेचा तोच ओसंडून वाहणारा भाव भाविकांच्या रोमारामातून उत्सर्जित होत असतो. मंदिरात जे-जे काही आहे ते-ते पवित्रच, हा भाव त्या क्षणांना प्रबळ असतो. अंगारा, प्रसाद, तीर्थ या प्रसादांच्या विविध रुपांच्या माध्यमातून शरीरात पवित्र शक्तीचा प्रवेश आणि संचार होतो, असा दुर्दम्य विश्वास बाळगून प्रसाद, अंगारा, तीर्थ ग्रहण केले जाते. परंतु त्या अंगाऱ्यातच विष असेल तर? विचारही करवत नाही ना! पण हे प्रत्यक्षात घडले आहे. अंबादेवीच्या अंगारापात्रात विषारी मानल्या जाणाऱ्या पालीचे पिलू आढळून आले आहे. काळजात धस्स व्हावे, असा हा प्रकार वाढदिवसाची शुभ सुरुवात करण्यासाठी म्हणून सहकुटुंब अंबामंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भक्ताच्याच लक्षात आला. पोटच्या चिमुकल्यांनी तो अंगारा जिव्हेवर ठेवला होता. त्यांना काही झाले तर नसेल ना, अशी चिंता बाप म्हणून त्या भक्ताच्या काळजात चर्रर्र करून गेली. त्या सजग भक्ताने अंगाऱ्यातील पाल कॅमेऱ्यात कैद केली. देणगी काऊंटरवर सूचनाही दिली.
अंबादेवी संस्थानचा कारभार नियमसंगतपणे चालविण्याची जबाबदारी काही मंडळींनी स्वीकारली आहे. ही कायदेशीर जबाबदारी स्वीकारणारी मंडळी भक्तांंना विषमुक्त, किटकमुक्त, प्रदूषणमुक्त, संक्रमणमुक्त अंगारा, प्रसाद आणि तीर्थ पुरविण्यास बांधिल आहेत. अंबेच्या मंदिराचा कारभार सांभाळण्याची संधी हा मिरविण्याचा मुद्दा नसून तो असंख्य भक्तांच्या सोई-सुविधा उभारण्यासाठीची स्वीकारलेली जबाबदारी होय. उभे राहणेही न शिकलेल्या बाळाला अंबादेवीच्या पात्रातील अंगारा विश्वासाने चाटविला जातो. निरागसांपासून तर मरणशय्येवर खिळलेल्यांच्या पोटात शिरणाऱ्या अंगाऱ्यात कुठलाही घातक घटक नसावाच, याची जबाबदारी ही मंदिराच्या कारभारावर देखरेख ठेवणाऱ्या तमाम लोकांची आहे. कायद्याच्या चाकोरीत आणि आई अंबेच्या साक्षीने स्वीकारलेल्या या जबाबदारीची जाणीव किमान या घटनेनंतर तरी व्हावी. अंगाऱ्याच्या पात्राची सुरक्षा कशी करता येईल, यासाठी तातडीने उपाय योजणे आणि भाविकांचा मंदिराशी जुळलेला भक्तीधागा कुठेही उसवला जाऊ नये, यासाठीची जबाबदारी लिलया पार पाडणे, याक्षणीचे आद्यकर्तव्य ठरावे.