वाहन न दाखवताच घ्या ‘पीयूसी’
By admin | Published: January 21, 2015 11:59 PM2015-01-21T23:59:50+5:302015-01-21T23:59:50+5:30
शहरातील विविध मार्गांवरून दररोज हजारोे वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणरहित असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या ‘पीयूसी’ केंद्रांकडून देण्यात येते.
लोकमत चमू अमरावती
शहरातील विविध मार्गांवरून दररोज हजारोे वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणरहित असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या ‘पीयूसी’ केंद्रांकडून देण्यात येते. मात्र, ‘पीयूसी’देताना पाळावयाचे निकष धाब्यावर बसवून ‘वाहन क्रमांक सांगा आणि पीयूसी घेऊन जा’ असा प्रकार सर्रास सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान उघड झाले.
प्रादेशिक परिवहन विभागाचा या पीयूसी केंद्रांवर कोणताच अंकुश नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी शहरातील अनेक भंगारावस्थेत पडून असलेल्या वाहनांची ‘पीयूसी’ या केंद्रांकडून केवळ वाहनक्रमांक सांगून अगदी सहजरीत्या मिळविली.
शहरातील वाढत्या प्रदूषणाची कारणमीमांसा या स्टिंग आॅपरेशनंतर अगदी सहजरीत्या करता येईल. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यात फिरते आणि स्थायी स्वरूपाचे एकूण १७ ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र’ अधिकृतरीत्या सुरू आहेत. यामध्ये १२ केंद्र शहरात तर ५ केंद्र ग्रामीण भागात कार्यरत आहेत.
यापैकी बहुतांश केंद्रांवर वाहने न तपासताच पीयूसी देण्यात येते. या प्रकारामुळेच अमरावती शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. वाहनांची अवस्था व ते प्रदूषणरहित आहे काय, याची शहानिशा न करताच ‘पीयूसी’ दिली जात असल्याने अमरावतीकरांच्या आरोग्याला धोका उद्भवत आहे.
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय
वेळ :१.३५
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धूळ खात पडलेल्या कार एम.एच.२७-ए.ए.-५ वाहनाचे छायाचित्र आमच्या छायाचित्रकाराने टिपले. त्यानंतर काही वेळातच आरटीओ कार्यालयासमोर असणाऱ्या एका पीयूसी केंद्रावर वाहन न आणताच त्याच वाहनाची ५० रुपये देऊन पीयूसी काढली. ही संशयास्पद वाटल्याने केंद्र संचालकाने ‘लोकमत’ प्रतिनिधीकडून ती पीयूसी काढून घेतली. पैसे परत केले. यावरून भोंगळ कारभार चव्हाट्यावर आले
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय
दि.-१९ जानेवारी
वेळ : दुपारी १२.१५ वाजता
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कार एम.एच.-२७-ए.ए.-११११ या वाहनाचे हे छायाचित्र. शहरातील दुसऱ्या पीयूसी केंंद्रावर जाऊन वाहन न दाखविता या वाहनाची पीयूसी मिळविली. त्यावेळी केंद्रावरील कर्मचाऱ्याने वाहन कुठे आहे, असा प्रश्न केला. पण नंतर लगेच प्रमाणपत्र दिले.