रमेश बुंदिले यांचा प्रचार करू नका, अन्यथा कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:18 AM2024-11-05T11:18:31+5:302024-11-05T11:18:55+5:30
Amravati : पदाधिकाऱ्यांना तंबी, भाजप जिल्हा सरचिटणिसांची पत्रकार परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : माजी आमदार रमेश बुंदिले हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत, भाजपचे नाहीत. त्यांच्या प्रचारासाठी दर्यापुरातील काही भाजप पदाधिकारी फिरत आहेत, तसेच त्यांची छबीदेखील प्रचार बॅनरवर झळकत आहे. वारंवार सूचना देऊनही जे पदाधिकारी ऐकणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवून कारवाई करू, अशी तंबी भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. विलास कविटकर व विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.
माजी आमदार रमेश बुंदिले हे २०१४ मध्ये भाजपचे आमदार म्हणून दर्यापूर मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळीसुद्धा त्यांनी पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली. मात्र, मतदारसंघ महायुतीतील शिंदेसेनेकडे गेल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या प्रचारासाठी भाजपचे काही पदाधिकारी सोबत फिरत आहेत. त्यांच्यावर येत्या दोन दिवसात कारवाई होईल, असे डॉ. विलास कविटकर व गोपाल चंदन यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला कें. अभिजित अडसूळ, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखेडे, शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पद्माकर सांगोळे, महायुती समन्वयक माणिकराव मानकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीराम नेहर, अनिल कुंडलवाल, विजय मेंढे, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा रोशन कट्यारमल, माजी नगरसेवक नाना माहूरे, प्रमोद सपकाळ, प्रफुल्ल लोडम, दीपक पारोदे, राजेश शेगोकर हे उपस्थित होते.