उंटावरून शेळ्या हाकलू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:07 PM2018-12-27T22:07:23+5:302018-12-27T22:07:44+5:30
नियोजनशून्य कारभार व समन्वयाच्या अभावामुळे शहरात निर्माण झालेली वाहतूक कोंडी कदापि खपवून घेणार नाही. कॅज्युअली घ्याल, तर मी अॅक्शन घेईन, काम पडल्यास फौजदारी कारवाईलासुद्धा सामोरे जावे लागेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नियोजनशून्य कारभार व समन्वयाच्या अभावामुळे शहरात निर्माण झालेली वाहतूक कोंडी कदापि खपवून घेणार नाही. कॅज्युअली घ्याल, तर मी अॅक्शन घेईन, काम पडल्यास फौजदारी कारवाईलासुद्धा सामोरे जावे लागेल. उंटावरून शेळ्या हाकलणे बंद करा. रस्त्यांवर उतरून कामे करा, अशा शब्दांत आ. सुनील देशमुख यांनी कंत्राटदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले.
गुरुवारी पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात 'ट्रॅफिक जाम'विषयी झालेल्या धमासान चर्चेत आ. देशमुख यांनी प्रशासकीय अधिकाºयांनाही खडसावत कामकाजात सुधारण्याचे निर्देश दिले. यावेळी मंचावर आ. सुनील देशमुख, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, महापालिका आयुक्त संजय निपाणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे उपस्थित होते. सोबतच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव, प्रदीप चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त गोर्डे व पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे उपस्थित होते. आमदार सुनील देशमुख यांनी दिलेल्या वेळनुसार, सायंकाळी ४ वाजताच बैठकीला सुरुवात केली. वेळेनुसार बैठकीला उपस्थित राहण्याच्या सवयीचा त्यांनी आवर्जुन उल्लेखही केला.
शहरातील 'ट्रॅफिक जाम' कशामुळे निर्माण होत आहे? जबाबदारी कोण, कोण जबाबदारी टाळत आहेत, कोण कामचुकारपणा करीत आहेत, याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचीदेखील कानउघाडणी केली. वाहतूक पोलिसांनीही आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, केवळ पावत्या फाडण्यात मग्न राहून चालणार नाही. याशिवाय वरिष्ठ अधिकाºयांनी केबीनमध्ये बसून वाहतुकीची समस्या सुटणार नसल्याचे ते पोलिसांना म्हणाले. याशिवाय आॅटोच्या मनमानी कारभारावर अंकुश लावण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर त्यांनी ताशेरे ओढत कामात गती आणा, रात्रीतून कामे करा, असे निर्देश दिले. अतिक्रमणधारक हॉकर्सचा बंदोबस्त लावण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी सांभाळवून लोकांप्रती जागृत राहून काम करायला हवे, लोकांच्या समस्या दुर करण्याचे आवाहनही आमदार देशमुख यांनी यावेळी केले.
- तर त्या पोलिसांवर कारवाई करू
आ. सुनील देशमुख यांनी 'ट्रॅफिक जाम'विषयी बैठकीत पोलिसांसह पीडब्ल्युडी, महापालिका, जीवन प्राधिकरण, वीज वितरणाच्या अधिकाºयांना लोकांप्रतीच्या जबाबदारी समजावून सांगितली. या विषयावर बोलताना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी पोलिसांची बाजू मांडत, आम्ही आमच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आमचे पोलीस कर्मचारी जर कामचुकारपणा करीत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करू, असे बाविस्कर म्हणाले. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्तांनीही अतिक्रमणाच्या विषयी गंभीरतापूर्वक काम करण्याची ग्वाही दिली. पीडब्ल्युडी अधिकाºयांनीही लोकांना अडचण होणार नाही, या पद्धतीने कामे होईल, असे आश्वासन दिले.