श्रीमंतांनो, गॅस सबसिडी घेऊ नका!
By admin | Published: April 6, 2015 12:32 AM2015-04-06T00:32:47+5:302015-04-06T00:32:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान हे गरजूंनाच मिळावे, असे अपेक्षित समजले आहे.
गरजूंना लाभ द्या : पालकमंत्र्यांचे आवाहन
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान हे गरजूंनाच मिळावे, असे अपेक्षित समजले आहे. मात्र, सरकसट सर्वच वर्गातील व्यक्ती ही गॅस सबसिडी घेत असून अनुदानाच्या स्वरुपाची ही रक्कम मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे श्रीमंत व्यक्तींनी गॅस सबसिडी घेऊ नये, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
सबसिडी गरजू वर्गासाठीच असून जिल्ह्यातील श्रीमंत व्यक्तींना मी स्वत: पत्रव्यवहार करुन घरगुती गॅस अनुदान घेणे बंद करा, अशी विनंती करणार असल्याचे ना. पोटे म्हणाले. खरे तर तीन लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्यांसाठी सबसिडी नाहीच, तरीदेखील काहीजण गॅस सबसिडी घेत असल्याचे वास्तव आहे. सबसिडी ही गरीब, सामान्य कुटंबांसाठीच असल्याचे पोटे यांनी मान्य केले. यावेळी चिखलदरा येथे स्ट्राबेरीची शेती, कृषी, सिंचन, रोजगार, अमरावती शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
आयकरमधून श्रीमंतांची यादी मागविणार
श्रीमंत व्यक्तींनी गॅस सिलिंडरची सबसिडी घेऊ नये, यासाठी आयकर विभागातून श्रीमंतांची यादी मागविणार, असे ना. पोटे यांनी स्पष्ट केले. ज्या व्यक्तींची उत्पन्न मर्यादा ३ लाखांपेक्षा अधिक आहे त्यांच्या नावे पत्र पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सबसिडीची रक्कम विकासासाठी खर्च करण्यास पुढाकार घेण्यास श्रीमंतांना अवगत केले जाईल, असे ना. पोटे म्हणाले. या बाबीला श्रीमंत व्यक्ती नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.