आमचं कुंकू पुसू नका!

By admin | Published: January 22, 2015 12:19 AM2015-01-22T00:19:48+5:302015-01-22T00:19:48+5:30

राज्य शासनाने मंगळवारी चंद्रपूर जिल्हा दारुबंदी करण्याची ऐतिहासिक घोषणा करुन महिलांच्या मागणीला न्याय दिला.

Do not wipe our keynote! | आमचं कुंकू पुसू नका!

आमचं कुंकू पुसू नका!

Next

अमरावती : राज्य शासनाने मंगळवारी चंद्रपूर जिल्हा दारुबंदी करण्याची ऐतिहासिक घोषणा करुन महिलांच्या मागणीला न्याय दिला. या निर्णयाचे सर्वच स्तरावर स्वागत होत असताना स्थानिक नवसारी परिसरात असलेले देशी दारु विक्रीचे दुकान कायम हद्दपार करण्यासाठी बुधवारी महिलांनी जिल्हाकचेरीवर धाव घेतली. ‘साहेब, दारुचे दुकान बंद करा, आमचे कुंकू वाचवा’ अशी हार्त हाक त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली.
काही दिवसांपूर्वी येथील वडाळीत सुरु असलेले देशी दारु विक्रीचे दुकान महिलांच्या संघटित आंदोलनाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बंद करायलो लावले. वडाळी येथील दारुबंदी आंदोलनाची दखल न्यायालय, राज्य शासनाला घ्यावी लागली. वडाळी येथील महिलांनी दारुबंदीसाठी केलेल्या आंदोलनाची प्रेरणा घेत स्थानिक नवसारी येथील बचत गटातील महिलांनीदेखील आंदोलनाला सुरूवात केली आहे.
देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी त्या एकवटल्या आहेत. या दारु विक्रीच्या दुकानापासून सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याची गाऱ्हाणी मांडताना काही महिलांनी ‘आमचे नवरे काम धंदा काही करीत नाहीत, केवळ दिवसभर दारु ढोसण्यातच मग्न असतात. मुला-बाळांचे शिक्षण, संगोपन कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सतत दारु पीत असल्याने काही जण मृत्यूच्या दाढेत आहेत. त्यामुळे साहेब, आमचे कुंकू पुसू नका’ असा सवाल उपस्थित करुन देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. या दारु विक्रीच्या दुकानामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. मुलींना रस्त्यावरुन ये- जा करणे कठीण झाले आहे. परिसरात डी.एड., नर्सिंग प्रशिक्षण केंद्र तसेच महापालिकेची शाळा आहे. या परिसर कामगार, मजूर वस्तीचा भाग आहे. दारु पिण्याच्या वादातून अनेक घरांमध्ये पती, पत्नीत वाद होत आहेत. मुलांचे शिक्षण, आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहेत. पती, पत्नीच्या वादातील तक्रारी या पोलिसात पोहोचत आहेत.
विशेषत: या दारु विक्रीच्या दुकानापासून महिला त्रस्त झाल्या असून सामाजिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी हे दुकान कायम हद्दपार करण्यात यावे, अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा महिलांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना अमोल इंगळे, दीपक सरदार, मनोज थोरात यांच्या नेतृत्वात दिले आहे. यावेळी मीरा तायडे, प्रतिभा ढोके, अनुसया वाघमारे, शीला नाईक, संध्या इंगळे, संगीता नितनवरे, वृषाली गायकवाड, पार्वता गायकवाड, चंद्रकला गायकवाड, कमला जामनिक, कंचना इंगळे, कविता तानोडे, राज्यकन्या तानोडे, सविता तायडे, आशा गायकवाड, ताईबाई गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Do not wipe our keynote!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.