आभाळमाया पाझरेना

By Admin | Published: July 11, 2017 12:06 AM2017-07-11T00:06:11+5:302017-07-11T00:06:11+5:30

तुरळक पावसाचा अपवाद वगळता जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडलाच नसल्याने पेरणी करून चुकलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Do not worry | आभाळमाया पाझरेना

आभाळमाया पाझरेना

googlenewsNext

पावसाची प्रदीर्घ दडी : दोन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे सावट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तुरळक पावसाचा अपवाद वगळता जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडलाच नसल्याने पेरणी करून चुकलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऐन पावसाळ्यात ऊन-सावलीचा खेळ सुरू असल्याने पेरणी झालेल्या साडेतीन लाख हेक्टरपैकी किमान दोन लाख हेक्टरमधील पेरणीला मोड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
आज ना उद्या पाऊस येईल या आशेपोटी शेतकऱ्यांनी पेरणी केली.मात्र, हवामान खात्याचा अंदाज, पंचागकर्त्यांचे भाकित खोटे ठरले. आभाळमायेला पाझर फुटलाच नाही. त्यामुळे बळीराजावर आरिष्ट ओढवले आहे. बियाणे, खतांची दुकाने देखील ओस पडली. मृगाचा मेंढा अन् आर्द्राच्या भरवशाच्या म्हशीने सुद्धा दगा दिल्याने पुनर्वसुच्या कोल्ह्यावर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र, लबाड कोल्ह्याने देखील शेतकऱ्यांशी दगा केल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. आठ ते दहा जून दरम्यान तुरळक पावसाची सुरूवात झाल्यानंतर आता मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करीत हवामान खात्याने स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र नंतर पावसाने दिलेल्या धक्क्यातून हवामान विभागासह तज्ञही सावरले नाहीत.
हवामानाच्या या अंदाजावर विसंबून पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांंना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सात लाख २८ हजार ११२ हेक्टर सरासरी क्षेत्र कृषी विभागाद्वारे प्रस्तावित असून त्यातुलनेत सध्या साडेतीन लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यामध्ये संरक्षित सिंचनाची सुविधा असणारे किमान एक लाख हेक्टर क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रावर दुबार पेरणीचे सावट आहे. बिजांकुरण झालेली ईवलीशी रोपे माना टाकत आहेत. त्या रोपट्यांना ओंजळीने पाणी देऊन जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पावसाचा प्रदीर्घ खंड असल्याने तूर वगळता ६० दिवसांच्या कालावधीतील मूग व उडिदाचे क्षेत्र आता बाद झाले आहे. सोयाबीन पेरणीसाठी देखील याच आठवड्याचा कालावधी असल्याने पावसाचा ताण अधिक असल्यास हे क्षेत्र अल्पकालावधीत उत्पन्न देणाऱ्या कपाशीक्षेत्रात परीवर्तीत होण्याची शक्यता आहे.

आर्द्रता नसल्याने पिके कोमेजली
पावसाची दडी असल्याने दिवसाचे तापमानही वाढले आहे. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. ज्याठिकाणी पेरणी आटोपल्या व थोडक्या आर्द्रतेवर बिजांकुरण झाले, तेथील ईवली रोपे माना टाकत आहेत. बिंजाकुराचे प्रमाण देखील कमी असल्याने उभ्या पिकात शेतकरी नांगर फिरवित असल्याचे विदारक चित्र आहे.

१४ जूनपर्यंत अशीच राहणार स्थिती
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र किंवा द्रोणीय स्थिती नसल्याने विदर्भात तुरळक वगळता जोरदार पावसाची शक्यता नाही. ही स्थिती १४जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. पूर्व-मध्य उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कमी दाबाचे क्षेत्र असून चार किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. विदर्भात पाऊस बरसण्यासाठी शक्तीशाली हवामानाची स्थिती नसल्याने १३ व १४ जुलै रोजी तुरळक पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.

अपेक्षित सरासरीच्या ४९ टक्केच पाऊस
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर याकालावधीत ८१४ मि.मी. तर एक ते १० जून या कालावधीत २३५.२ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ११७.२ मि.मी. पाऊस पडला. ही टक्केवारी ४९.५ इतकी असून हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १४.४ टक्के इतका आहे. भातकुली, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार व दर्यापूर तालुक्यात अद्याप १०० मि.मी.च्या आत पाऊस असल्याने पेरण्या धोक्यात आल्या आहेत.

तूर वगळता कडधान्य होणार बाद
पावसाचा प्रदिर्घ खंड असल्याने तूर वगळता ६० दिवसांच्या कालावधीतील मूग व उडिदाचे क्षेत्र बाद आता कालावधी झाल्याने बाद झाले आहे. सोयाबीन पेरणीचा कालावधी देखील हाच आठवडा असल्याने पावसाची तान अधिक असल्यास हे क्षेत्र अल्प कालावधीत उत्पन्न देणाऱ्या कपाशी क्षेत्रात परिवर्तीत होण्याची शक्यता आहे.

Web Title: Do not worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.