दरोड्याचा बेत : एकास अटक, चार पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 09:59 PM2018-09-05T21:59:53+5:302018-09-05T22:00:09+5:30
दरोडा टाकण्याच्या बेताने पडक्या घरात दबा धरून बसलेल्या आरोपीला अटक करण्यात आली, तर चौघे पसार झालेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री खोलापुरी गेट हद्दीत ही कारवाई केली. आरोपी शुभम मनोज गुल्हाने (२०,रा. पार्वतीनगर) याचेकडून दोन तलवारी, लोखंडी रॉड व मिरची पूड जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दरोडा टाकण्याच्या बेताने पडक्या घरात दबा धरून बसलेल्या आरोपीला अटक करण्यात आली, तर चौघे पसार झालेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री खोलापुरी गेट हद्दीत ही कारवाई केली. आरोपी शुभम मनोज गुल्हाने (२०,रा. पार्वतीनगर) याचेकडून दोन तलवारी, लोखंडी रॉड व मिरची पूड जप्त केली.
गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम गिते यांच्या पथकाने रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास खोलापुरी हद्दीतील परकोटाजवळील एका पडक्या घरावर छापा मारला. पोलीस दिसताच आरोपींनी अडचणीच्या जागेवरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केला असता, शुभम गुल्हाने त्यांच्या हाती लागला. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेऊन तेथे दोन तलवारी, रॉड व मिरची पूड जप्त केले. पोलिसांनी आरोपी शुभमची चौकशी केली असता ते दखलपात्र गुन्ह्याच्या उद्देशाने योजना आखत असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी शुभम गुल्हानेला अटक केली असून, हर्षल बोरकर, अक्षय मोर्या व अन्य दोन आरोपींची शोध मोहिम सुरु केली आहे. आरोपीला खोलापुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शुभम गुल्हाने याच्याविरुद्ध राजापेठ व गाडगेनगर ठाण्यात विविध गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. याशिवाय शुभमने यवतमाळात पिस्टलच्या धाकावर जबरी चोरी केल्याचाही गुन्हा आहे. मारहाण प्रकरणात तो फरार आरोपी असल्याची माहिती आहे.