शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांची विभागीय चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:02 PM2018-11-30T23:02:07+5:302018-11-30T23:02:32+5:30
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके यांनी माहिती अधिकारात त्रोटक व अपूर्ण माहिती दिल्याच्या मुद्द्यावर प्रवीण तायडे जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या आमसभेत चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी टाके यांच्या विभागीय चौकशीची मागणी सभागृहाला केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके यांनी माहिती अधिकारात त्रोटक व अपूर्ण माहिती दिल्याच्या मुद्द्यावर प्रवीण तायडे जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या आमसभेत चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी टाके यांच्या विभागीय चौकशीची मागणी सभागृहाला केली.
प्रवीण तायडे यांनी मार्च महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना माहिती अधिकारात सन २०१२-१३ पासून आतापर्यंतची पदभरती संदर्भातील माहिती मागविली. नोव्हेंबर महिना संपताना माहिती देण्यात आली, तीही अपूर्णच! माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सन २०१२-१३ पासून आतापर्यंत किती शिक्षकांच्या पदभरतीस मान्यता दिली. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता घेतली होती का? २ मे २०१२ च्या शासन निर्णयानुसार पदभरती करण्यास मनाई आहे. असे असताना १३ संस्थांमध्ये १८ शिक्षकांची पदभरती कशी केली? या मुद्द्यांवर तायडे यांनी माहिती मागितली होती.
सीईओंकडे पती-पत्नीची तक्रारही
शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करावी, अशी तक्रार प्रवीण तायडे यांनी सीईओंकडे २२ नोव्हेंबर रोजी केली. भातकुली पंचायत समितीत शालेय पोषण आहार अधीक्षक असलेले टाके यांचे पती सचिन गुल्हाने यांच्याविरोधात गाडगेनगर, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. या दाम्पत्यावर कारवाई करावी, गुल्हानेंची त्वरित बदली करावी, या मागण्या आहेत.