डॉक्टरांची एक्झिट आणि रीएन्ट्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:24+5:302021-06-18T04:10:24+5:30
कटाक्ष अमरावती : ‘भाजपक्षाने आपल्याला कधीही डावलले नाही, नेहमी सन्मानच केला. परंतु, आपण मूळ काँग्रेसी विचारसरणीचे समर्थक असल्याने पुन्हा ...
कटाक्ष
अमरावती : ‘भाजपक्षाने आपल्याला कधीही डावलले नाही, नेहमी सन्मानच केला. परंतु, आपण मूळ काँग्रेसी विचारसरणीचे समर्थक असल्याने पुन्हा घरवापसीचा निर्णय घेत आहे’, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेस प्रवेशाबाबत दिलेली ही प्रतिक्रिया तशी कुणाच्याही पचनी पडणार नाही. सर्व आलबेल असताना अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय डॉ. देशमुखांना का घ्यावा लागला, याबाबतची समीक्षा आता होऊ लागली आहे. पाच दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यांची देशमुखांसोबत झालेली गुप्त भेट या घरवापसीसाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात असले तरी डॉक्टरांना भाजपमध्ये ‘सफोकेशन’ होत असल्याची बाब राजकीय वर्तुळात खमंग चर्चेचा मेन्यू झाली आहे. महापालिका निवडणुकीपासून सुरू झालेली ही कुजबुज त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयानंतर अधिक स्पष्ट झाली आहे. डॉ. देशमुख अमरावती जिल्ह्यातील हेवीवेट नेते. त्यांच्या नेतृत्वाचा जसा फायदा काँग्रेसला झाला होता, तसा भाजपलाही झाला असता. नेमकी हीच बाब हेरून भाजप श्रेष्ठींनी त्यांना पक्षात आणले. प्रदेश उपाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली; पण स्थानिक राजकारणातील निर्णयप्रक्रियेत वेळोवेळी डावलण्यात आले. परिणामी डॉक्टरांनी हा निर्णय घेतला असावा. महापालिकेत ४५ पैकी २२ नगरसेवक डॉ. सुनील देशमुख समर्थक असल्याने काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळेल. या निमित्ताने भाजपमधील गटबाजी संपुष्टात येईलही, पण सहा महिन्यांनंतर होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपचा पोळा फुटेल, त्याचे काय? तर आता काँग्रेसमध्ये गटबाजीला खतपाणी तर मिळणार नाही, अशी भीतीही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. महानगरात डॉ. देशमुखांचे प्राबल्य असल्याचे जाणकार सांगतात, तर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या घराण्याकडे काँग्रेसचे शहर अध्यक्षपद असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत पक्षांतर्गत खटके उडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांना डॉक्टरांशी जुळवून घेण्याचा कानमंत्र दिल्याचे खुद्द कार्यकर्ते सांगतात. स्थानिक भाजप नेत्यांमध्ये डॉक्टरांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयानंतर फारशी चिंता दिसत नसली तरी प्रदेश उपाध्यक्षानेच पक्षाला रामराम ठोकावा, हा भाजप पक्षश्रेष्ठींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.