आमिर खानकडून मेळघाटच्या आदिवासी शेतकऱ्यावर वृत्तचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:09 AM2021-06-23T04:09:58+5:302021-06-23T04:09:58+5:30

फोटो - २२एएमपीएच०१, २२एएमपीएच०२, २२एएमपीएच०३, २२एएमपीएच०४, २२एएमपीएच०५ कॅप्शन - मौजीलाल भिलावेकर यांच्या शेताला भेट देताना शासकीय अधिकारी व पानी ...

Documentary on tribal farmers of Melghat by Aamir Khan | आमिर खानकडून मेळघाटच्या आदिवासी शेतकऱ्यावर वृत्तचित्र

आमिर खानकडून मेळघाटच्या आदिवासी शेतकऱ्यावर वृत्तचित्र

Next

फोटो - २२एएमपीएच०१, २२एएमपीएच०२, २२एएमपीएच०३, २२एएमपीएच०४, २२एएमपीएच०५

कॅप्शन - मौजीलाल भिलावेकर यांच्या शेताला भेट देताना शासकीय अधिकारी व पानी फाऊंडेशनचे पदाधिकारी.

---------------------------------------------------------------------------------------------

मौजीलालच्या ‘पगार देणारे शेत’ची माहिती, तीन एकरात घेतात ३८ प्रकारचे सेंद्रिय पीक

लोकमत विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क

नरेंद्र जावरे - परतवाडा (अमरावती) : निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या होत आहेत. मात्र, मेळघाटातील आदिवासी कोरकू शेतकरी निसर्गाला शरण न जाता तीन एकर शेतात वर्षभरात तब्बल ३८ प्रकारची पिके सेंद्रिय पद्धतीने पीक घेत आहे. अभिनेता आमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनने त्याची दखल घेत या शेतकऱ्यावर वृत्तचित्र तयार केले आहे.

मौजीलाल भिलावेकर (रा. मान्सुधावडी, ता. धारणी) असे या कष्टकरी प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे वनशेतीचे मॉडेल त्यांनी उभे केले आहे. गत १५-२० वर्षांपासून आपण जंगलातच गेलो नाही, तर जंगलच शेतात आणले असल्याचे मौजीलाल भिलावेकर सांगतात. शेतीच्या धुऱ्यावर त्यांनी २०० पेक्षा अधिक विविध प्रकारची उत्पन्न देणारी झाडे लावली आहेत. आंबा, फणस, बांबू अशा विविध प्रजातीच्या झाडांपासून वर्षाकाठी ६०ते ७० हजार रुपये त्यांना मिळतात.

बॉक्स

बियाणे शेतातील, रासायनिक फवारणी नाही

शेतात विविध प्रकारच्या पालेभाज्या, सोयाबीन, दोन प्रकारचे गहू, कापूस या पिकांसह विविध ३८ प्रकारचे उत्पादन मौजीलाल भिलावेकर घेत असले तरी बियाणे ते स्वतः उत्पादित केलेल्या पिकातूनच तयार करतात. गांडुळखत व शेणखताचा वापर करतात. पिकावर असणारी फवारणीचे द्रव रासायनिक नव्हे, घरीच तयार केले जाते. त्यामुळे निरोगी शेती जास्त उत्पादन देत असल्याचे ते आवर्जून सांगतात.

बॉक्स

‘पगार देणार शेत’चे चित्रीकरण

पानी फाऊंडेशनच्या चमूने दोन वर्षांपासून अथक परिश्रम घेत मौजीलाल भिलावेकर यांच्या शेती करण्याच्या पद्धतीसह मासिक उत्पन्नावर चित्रीकरण केले. इतरही शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा, या हेतूने या वृत्तचित्राची निर्मिती करण्यात आली. ‘पगार देणार शेत’ असे नाव ठेवून रविवारी तो ऑनलाईन प्रदर्शित झाला. आमिर खान, पानी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, दिग्रस येथील बियाणे पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख, वाशिमचे जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, राहुरीचे मृदा शास्त्रज्ञ अनिल दुरगुडे, कीटकशास्त्रज्ञ राजेंद्र जाधव यांनी तो पाहिला. या वृत्तचित्राकरिता सहायक दिग्दर्शक तथा अभ्यासक म्हणून माजी जिल्हा समन्वयक धनंजय सायरे होते. गीता बेलपत्रे, सुरेश सावलकर यांनी विशेष सहकार्य केले.

कोट

गेल्या अनेक वर्षांपासून शेतात नवनवीन प्रयोग करीत आहे. आज तीन एकरात मी ३८ प्रकारचे उत्पादन घेतो. त्यातून चांगली मिळकत मिळते. कुठल्याही प्रकारचे रासायनिक फवारे वापरत नाही. बियाणे स्वतःच्या शेतात तयार करतात.

मौजीलाल भिलावेकर, शेतकरी

कोट

बांधावर स्थानिक प्रजातींची झाडे लावली, तर उत्पन्न मिळते. इंधनासाठी जंगलात जावे लागत नाही. समृद्ध गाव स्पर्धेचा स्तंभच ‘शेतकरी समृद्ध झाले पाहिजे’ असा आहे. मोजीलाल यांचे प्रयोग प्रेरणादायी आहे.

- वैभव नायसे, तालुका समन्वयक, पानी फाऊंडेशन, चिखलदरा

Web Title: Documentary on tribal farmers of Melghat by Aamir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.