सायन्स कोअर मैदानावर ‘डॉग शो’; देशी, विदेशी श्वान ठरले आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:31 PM2023-01-23T13:31:14+5:302023-01-23T14:05:02+5:30
देश-विदेशातील प्रजाती पाहण्यासाठी श्वानप्रेमींची गर्दी, पाच लाखांपासून तर २० हजार रुपयांपर्यंत किमतीचे श्वान ठरले लक्षवेधी
अमरावती : अमरावती केनेल क्लबच्या वतीने सायन्स कोअर मैदानावर रविवारी भव्य ‘डॉग शो’चे आयोजन करण्यात आले. यात देश-विदेशातील प्रजाती पाहण्यासाठी श्वानप्रेमींनी एकच गर्दी केली होती. ‘डॉग शो’ मध्ये पाच लाखांपासून तर २० हजार रुपये किमतीचे श्वान लक्ष वेधणारे होते, हे विशेष.
‘डॉग शो’मध्ये सर्व प्रकारच्या प्रजातीच्या श्वानांना स्पर्धेत सहभाग घेता आला. सायन्स कोअर मैदानावर सकाळी १० वाजतापासून या ‘डॉग शाे’मध्ये श्वानप्रेमींसह नागरिकांची गर्दी लक्षणीय ठरली. यात ३५०पेक्षा जास्त श्वानप्रेमींनी स्पर्धेत नोंदणी केली होती. प्रत्येक प्रजातीच्या श्वानांमध्ये तीन प्रकाराच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात १ ते १२ महिने, १ ते २ वर्ष, तर २ वर्षांवरील श्वान अशी स्पर्धेची वर्गवारी निश्चित करण्यात आली होती. ‘डॉग शाे’ मध्ये एकूण ३२ प्रकारांच्या श्वानांची नोंद करण्यात आली आहे. देश, विदेशी ब्रीड, क्रॉस केलेले श्वानांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
'हे' श्वान होते आर्कषण
जर्मनचा रॉट व्हिलर, थायलंडचा मणी, पाकिस्तानचा कारवन हॉउल्ड, अमेरिकन अकिता, कॅनडाचा बिगल, पंजाबचा लॅब्राडोर, चायनाचा चाव चाव, इटलीचा केन कोर्सेा, टायसन, ग्रेड डेन, हस्की आदी देश-विदेशातील श्वान आर्कषण ठरले.
‘डॉग शो’चे आयोजन होणे, ही बाब श्वानप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली. एकाच छताखाली विविध प्रजातींचे श्वान पाहण्याची संधी अंबानगरीवासीयांना मिळाली. या आयोजनामुळे अमरावतीत देश-विदेशातील श्वानांच्या प्रजातीची संख्या लक्षात आली.
- डॉ. सचिन बोंद्रे, पशु वैद्यकीय अधिकारी, महापालिका