सावळापुरात पिसाळलेल्या श्वानाचा धुमाकूळ, दोघांचा मृत्यू, तिघांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 12:51 PM2021-11-21T12:51:47+5:302021-11-21T12:53:13+5:30
गावात भटकणाऱ्या श्वानांपैकी एका पिसाळलेल्या श्वानाने गावातील सात लोकांना चावा घेतला. श्वान चावल्यानंतर काही दिवसांनी दोघांची प्रकृती चिंताजनक बनली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांवर औषधोपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अचलपूर तालुक्यातील सावळापूर गावात पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यामुळे उपचारादरम्यान गावातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघांवर औषधोपचार सुरू आहेत.
दिवाळीच्या आधी, आठीच्या दरम्यान गावात भटकणाऱ्या श्वानांपैकी एका पिसाळलेल्या श्वानाने गावातील सात लोकांना चावा घेतला. श्वान चावल्यानंतर काही दिवसांनी दोघांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यांना उपचारार्थ अमरावती येथील रुग्णालयात दाखल केल्या गेले. दरम्यान प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्यात आले.
नागपूर येथे उपचारादरम्यान गुरुवार, १८ नोव्हेंबरला आराध्या भटकर नामक सात वर्षीय मुलीची तर शुक्रवार, १९ नोव्हेंबरला ५५ वर्षीय श्रीकृष्ण राऊत यांची प्राणज्योत मालवली. या दोन्ही मृतकांच्या पार्थिवावर गावातच अंतिम संस्कार केल्या गेलेत.
दरम्यान त्या पिसाळलेल्या श्वानाला ठार करण्यात आले असून अन्य जखमी लोक गावातच उपचार घेत आहेत. या घटनेमुळे गावात भीतीयुक्त वातावरण असून भटक्या श्वानांची चांगलीच दहशत पसरली आहे