आखाड्यातील विद्यार्थ्यांनी कापून खाल्ले श्वान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:26 PM2017-08-01T23:26:48+5:302017-08-01T23:27:42+5:30
बकरी, कोंबड्या कापून खाणारे आजपर्यंत अमरावतीकरांनी पाहिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बकरी, कोंबड्या कापून खाणारे आजपर्यंत अमरावतीकरांनी पाहिले आहेत. मात्र, चक्क श्वान कापून खाल्ल्याची ही पहिलीच घटना अमरावती शहरात उघडकीस आली. आखाडा नावाने प्रसिद्ध असणाºया हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात हा धक्कादायक प्रकार घडला असून परप्रांतीयांतील काही विद्यार्थ्यांनी चक्क श्वानाला कापून फस्त केल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला.
पशुपालकाने त्यांच्या हरविलेल्या श्वानाचा शोध घेतला असता त्यांच्या हातात केवळ श्वानाचे अवशेष लागले. त्यावरून श्वानाची ओळख पटली आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील वसतिगृहात श्वानाच्या मांसाची पार्टी रंगल्याचे पशुपालकाला माहिती पडले. या घटनेची तक्रार श्वानपालक हनुमान रंगराव शेळके (रा.खोलापुरी गेट) यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात सोमवारी नोंदविली असून या प्रकरणात पोलिसांनी विधीज्ञांचा सल्ला मागितला आहे.
पोलिसांनी केला पंचनामा
शेळके यांचा पाळलेला श्वान शनिवारी अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांनी त्याची शोधाशोध चालविली. मात्र, श्वान कुठेही आढळला नाही. सोमवारी ते श्वानाच्या शोधात हव्याप्र मंडळ परिसरात असणाºया परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृह परिसरात गेले असता त्यांना वसतिगृहासमोरील झाडाझुडुपात त्यांच्या श्वानाचे कातडे व हाडांचे अवशेष आढळून आले. त्यावेळी मांस खाण्यासाठी श्वानाला कापण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची तक्रार शेळके यांनी राजापेठ पोलिसांकडे केली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास राजापेठचे ठाणेदारांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
कायदेतज्ज्ञ विश्वकर्मा म्हणतात...
कायदेतज्ज्ञ अनिल विश्वकर्मा म्हणतात की, जर श्वानाला मारून खाल्ले असेल, तर पहिल्यांदा श्वान चोरीचा गुन्हा दाखल व्हायला हवा. पशू पालकाच्या मालकीचा श्वान होता. त्याचे नुकसान झाल्यामुळे भादंविच्या कलम ४२९ अन्वये गुन्हा होऊ शकतो. एखाद्या श्वानाने माणसाला चावा घेतल्यास गुन्हा दाखल केला जातो. त्यावेळी त्या श्वानाची नोंदणी असणे गरजेचे समजले जात नाही. त्यामुळे श्वानाची नोंदणी असेल, तरच गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, ही पळवाट असू शकते.
या रस्त्यावर नेहमीच ते श्वान बसलेले वा झोपलेले रहायचे. बाजूला झोपडपट्टी असल्याने टारगट मुले इकडे फिरतात. त्यामुळे त्या श्वानाला कुणी मारले, याचा तपास होस्टेलचे इंचार्ज करीत आहे. चौकशीअंती कळेल.
-प्रभाकरराव वैद्य, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ
पशुपालकाची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या श्वानाची महापालिकेत नोंद हवी होती. ती नसल्यामुळे श्वान पाळीव समजायचे की कसे, याबाबत संभ्रम आहे. विधी अधिकाºयांचा सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.
- अनिल मुळे, पोलीस उपनिरीक्षक
श्वानाला कापून खाण्यात आल्याची तक्रार राजापेठ पोलिसांत दिली आहे. मात्र, त्यावर अद्यापपर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली नाही.
- हनुमान शेळके, पशुपालक, खोलापुरी गेट.