जिल्ह्यातील आठ बाल विकास प्रकल्पांचा डोलारा प्रभारींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:02 PM2018-08-29T22:02:57+5:302018-08-29T22:04:21+5:30
कुपोषित बालकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील १४ पैकी आठ एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांचा डोलारा दोन वर्षांपासून शासनाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. अतिसंवेदनशील मेळघाटातील धारणी, चिखलदरा तालुक्यांचा कारभार चांदूर बाजार येथील अधिकारी पाहत असल्याचे संतापजनक चित्र आहे.
नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : कुपोषित बालकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील १४ पैकी आठ एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांचा डोलारा दोन वर्षांपासून शासनाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. अतिसंवेदनशील मेळघाटातील धारणी, चिखलदरा तालुक्यांचा कारभार चांदूर बाजार येथील अधिकारी पाहत असल्याचे संतापजनक चित्र आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रासाठी तालुकास्तरावरील एकात्मिक बाल विकास केंद्राचे कामकाज दोन वर्षांपासून कायमस्वरुपी अधिकाऱ्यांविना सुरू आहे. चिखलदरा, अचलपूर, मोर्शी, धारणी, अमरावती, भातकुली या सहा प्रकल्प कार्यालयांना अधिकारी आहेत.
दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, तिवसा, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या एकूण आठ बाल विकास प्रकल्प कार्यालयांवर दोन वर्षांपासून प्रभारी आहेत. अतिरिक्त पदभार लादल्याने अर्धे हे-अर्धे ते असा कामकाज सुरू आहे. रिक्त पदांबाबत शासनाला दरमहा जिल्हास्तरावरून अहवाल पाठविला जातो. परंतु, दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून श्रेणी-२ च्या अधिकाºयांचे रिक्त पद भरले गेले नाहीत. त्यामुळे सामान्यांची कामे विलंबाने होत आहेत.
शासनाची अनास्था बालकांच्या जीवावर
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील सीडीपीओंच्या रिक्त पदांबाबत लक्ष देण्याची गरज आहे. राज्यभरातील हजारो अंगणवाडी केंद्र अधिकाऱ्यांविना सुरू आहेत. त्यातूनच कुपोषित बालकांचा मृत्यू, व्हीसीडीसी केंद्र, गर्भवती स्तनदा मातांसाठी पोषण आहाराच्या योजना कशा सुरू असतील, याचे उत्तर अनुत्तरित आहे. त्यामुळे शासनाची अनास्था बालकांच्या जिवावर बेतणारी ठरत आहे.
अचलपूरचे रजेवर, चिखलदऱ्याचे चांदुरात
अचलपूर येथे शहाणे नामक कायमस्वरूपी बाल विकास प्रकल्प अधिकारी दिले गेले. मात्र, सदर अधिकारी अनेक दिवसांपासून रजेवर असल्याने तालुक्याचा पदभार प्रभारी सहायक बीडीओ सतीश खानंदे यांच्याकडे आहे. सीडीपीओ शहाणे यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सुट्या कसे दिल्या जातात, याच्या चौकशीची मागणी होत आहे. अतिसंवेदनशील चिखलदरा तालुक्याचे सीडीपीओ विलास दुर्गे यांना चांदूरबाजार तालुक्याचा अतिरिक्त पदभार दिल्याने संबंधित अधिकारी मेळघाटातील अंगणवाडी केंद्रे वाºयावर सोडून चांदूर बाजार येथून कारभार चालवत असल्याचे चित्र आहे. मेळघाटातील या अधिकाऱ्यांना कुठल्या नियमाने अतिरिक्त पदभार दिला गेला, हे गुलदस्त्यात आहे.
जिल्ह्यातील आठ बाल विकास प्रकल्प कार्यालयांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. रिक्त जागांबाबत शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे.
- प्रशांत थोरात, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, अमरावती