घरगुती गॅसची होणार ‘व्हॉट्स अप’वर नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 12:05 AM2017-06-13T00:05:06+5:302017-06-13T00:05:06+5:30
घरगुती गॅस मिळण्यासाठी आता तासन्तास रांगेत उभे राहण्याचा वनवास संपला आहे.
दिलासा : रांगेत उभे राहण्याचा वनवास संपला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : घरगुती गॅस मिळण्यासाठी आता तासन्तास रांगेत उभे राहण्याचा वनवास संपला आहे. ज्यांच्याकडे अॅण्ड्राईड मोबाईल असेल अशा ग्राहकांना ‘व्हॉट्स अप’ वर स्वयंपाकाच्या गॅसची नोंदणी करता येणार आहे. केंद्र सरकारने ही सुविधा लागू करण्याचा निर्णय घेतला असून बहुतांश ग्राहकांना घरी बसूनच गॅसची नोंदणी करता येणार आहे.
केंद्र सरकारने गरीब, सामान्यांना स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून दिला आहे. स्वयंपाकासाठी गॅस ही बाब स्वप्नवत वाटणारी असली तरी अनेकांच्या घरी गॅस कनेक्शन आले आहे. मोबाईल सतत हाताळल्या जाणाऱ्या ‘व्हॉट्स अप’वर घरगुती गॅस मिळविता येणार आहे. यापूर्वी फोनवर अथवा एसएमएसवर गॅस नोंदणी करता येत होती. केंद्र सरकारने ‘व्हॉट्स अप’ ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने अनेकांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. मोबाईल ग्राहक हे सर्वाधिक ‘व्हॉट्स अॅप’चा वापर करीत असल्याने पेट्रोलियम मंत्रालयाने सोशल मीडियाच्या वापर होणाऱ्या ‘व्हॉट्स अॅप’वर गॅस नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गॅस वितरकांना सूचनादेखील करण्यात आलेल्या आहेत.
व्हॉट्स अॅप गॅस नोंदणी हा उपक्रम चांगला आहे. या उपक्रमातून मनुष्यबळही कमी लागते. ग्राहकांना चुटकीसरशी गॅस नोंदणी करता येईल.
- रामेश्वर अभ्यंकर,
गॅस वितरक, अमरावती