दुष्काळ निवारणासाठी श्रमाला रक्तदानाची जोड
By admin | Published: May 18, 2017 12:26 AM2017-05-18T00:26:01+5:302017-05-18T00:26:01+5:30
दुष्काळावर मात करण्यासाठी वरूड तालुक्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून श्रमदानासाठी हजारो हात सरसावले आहेत.
बेनोड्यात राबले शेकडो हात : महसूल प्रशासनाचा पुढाकार, ‘वॉटर कप स्पर्धा’
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : दुष्काळावर मात करण्यासाठी वरूड तालुक्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून श्रमदानासाठी हजारो हात सरसावले आहेत. तालुक्यातील बेनोडा येथे दुष्काळावर मात करण्याचा निर्धार करीत नागरिकांनी श्रमदानासह रक्तदानही केले.
पाणी फाऊंडेशनच्यावतीने ४५ दिवसांची ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ राबविली जात आहे. स्पर्धेसाठी वरूड तालुक्याची निवड करण्यात आली असून विविध ठिकाणी जलयुक्त शिवार योजना राबविली जात आहे. बेनोडा (शहीद) येथे महसूल विभागाच्यावतीने महाश्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात महसूलसोबतच हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. याउपक्रमात जिल्हाधिकारी, कार्यालयातील अधिकारी, सर्र्व तहसीलदार, महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियान राज्यात सुरू आहे. यामाध्यमातून भूजल स्तर वाढविण्याचे प्रयत्न आहेत. सीसीटी, बंधारे, गावतलाव, शोषखड्डयांसह जलव्यवस्थापन आणि नियोजनावर भर देण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर उपविभागिय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार आशिष बिजवल, निवासी नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, गटविकास अधिकारी सतीश बुधे, सहायक गटविकास अधिकारी सुभाष बोपटे तसेच तलाठी, ग्रामसेवक सहभागी झाले. महिला, पुरुष, सेवाभावी संस्थाचे पदाधिकाऱ्यांनी श्रमदानातून उपक्रमास हातभार लावण्याचे कार्य जोमाने सुरू केले आहे.
पाणी आणि रक्त तयार करता येत नाही
महाश्रमदानासोबतच ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. शिबीरात श्रमदानानंतर अनेक महसूल अधिकारी, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. पाणी आणि रक्त दोन्ही घटक कुठेच तयार होत नसल्याने श्रमदानासोबतच रक्तदानाचे महत्त्व सुद्धा तितकेच असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.