बैलांऐवजी गाढवांचा पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:12 PM2017-08-21T22:12:17+5:302017-08-21T22:12:42+5:30
अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात मागील ५१ वर्षांपासून गाढवांचा पोळा भरतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात मागील ५१ वर्षांपासून गाढवांचा पोळा भरतो आहे. गाढवांचा पोळा म्हणताना हसू येत असले तरी बैलांप्रमाणेच गाढवांचादेखील हा सन्मानच आहे. परतवाडा शहरातील दयालघाट येथे व अचलपूर येथील बिलनघाटातही गाढव पालकांनी हा पोळा साजरा केला.
वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा-राजाकडून शेती मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे गाढवांकडून कुंभार समाजासह गाढव मालक कामे करून घेतात. गरीब का असेना, पण गाढव मालकांसाठी हा प्राणी त्यांच्या उपजिविकेचे साधनच आहे. त्या गाढवाची वर्षांतून एकदा पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घातले जाते. ज्याप्रमाणे शेतकरी बैलांचा पोळ्यानिमित्त साजश्रृंगार करतात त्याचप्रमाणे येथील कुंभार बांधवही गाढवांना सजवून त्यांची मिरवणूक काढत पोळा साजरा करतात.
मागील कित्येक वर्षांपासून जुळ्या शहरातील दयालघाट परिसरातील आनंद तायडे व साहेबराव तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने आपल्या गाढवांसह पोळ्यात हजेरी लावतात. मागील कित्येक वर्षांपासून हा पोळा साजरा होत आहे.
दोन दिवसांची विश्रांती
ज्याप्रमाणे शेतकरी बैलांना पोळ्याच्या दिवशी कामाला जुंपत नाही. त्याच प्रमाणे गाढव मालकही पोळ्याच्या व पाडव्याच्या दिवशी गाढवावर ओझे लादत नाही. यामुळे गाढवांना दोन दिवसांची विश्रांती मिळते. गाढवांना दिवशी सजविले जाते हे विशेष.
मागील पन्नासहून अधिक वर्षांपासून आम्ही ही परंपरा जपतो आहोत. पूर्वी शेकडो गाढव पोळ्याच्या तोरणाखाली असायचे. आता ही संख्यादेखील कमी झाली आहे.
- साहेबराव तायडे,
गाढवाचे मालक, परतवाडा