पळसखेड येथे भरला गाढवांचा पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:45 PM2019-08-31T23:45:30+5:302019-08-31T23:46:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर रेल्वे : वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा-राजाकडून शेतीच्या मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे पळसखेड येथे गाढवांकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा-राजाकडून शेतीच्या मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे पळसखेड येथे गाढवांकडून भोई समाजासह अन्य काही समाजातील घटक कामे करून घेतात. गाढव हा प्राणी त्यांच्या उपजीविकेचे साधनच आहे. पोळ्याच्या दिवशी ज्याप्रकारे बैलांना स्नान घालतात, झुल चढवितात, अगदी त्याच प्रमाणे पळसखेड येथे शुक्रवारी गाढवांनादेखील स्नान घालण्यात आले, झुल चढवली तसेच पुरणपोळीदेखील खाऊ घातली.
गाढवांना पोळ्याच्या तोरणा खाली उभे करून पूजन करण्यात आले. ज्याप्रमाणे शेतकरी बैलांचा पोळ्यानिमित्त साजश्रुंगार करतात, त्याचप्रमाणे येथील भोई समाजबांधवांनी गाढवांना सजवून व त्यांचा पोळा भरवून सण साजरा केला. पळसखेडमध्ये मागील २३ वर्षांपासून हा गाढव पोळा साजरा होत आहे. यंदाच्या सोहळ्यात ३०-३५ गाढव सहभागी करण्यात आली होती.
गाढव ऐटीत
भोई, कुंभार, वडार, बेलदार हे समाज वर्षानुवर्षे गाढव पाळत आले आहेत. यातील भोई समाज गाढवांबद्दलची आपली कृतज्ञता बैलपोळ्याप्रमाणेच गाढवांचा पोळा साजरा करून व्यक्त करत असतो. ज्या गाढवाची इतर सगळा समाज हेटाळणी करीत असतो, जे गाढव आपल्या भेसूर ओरडण्यासाठी परिचित आहे, जे गाढव कुरूपतेसाठी ओळखले जाते, तेच कष्टकरी गाढव पोळ्यात विविध वेलीफुलांच्या, नक्षींच्या रंगबेरंगी झुली पांघरलेले, विविध रंगांच्या रंगांनी रंगविले होते. यावेळी त्यांची वेगळीच ऐट भासत होती.