२५ कोटींवर समाधान मानू नका, एकल विद्यापीठासाठीही निधी देऊ, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
By उज्वल भालेकर | Published: April 10, 2023 05:29 PM2023-04-10T17:29:11+5:302023-04-10T17:32:37+5:30
व्हीएमव्हीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते
अमरावती : विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयाची वाटचाल ही एकल विद्यापीठाचा दर्जा मिळविण्याच्या दिशेने सुरु आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना या महाविद्यालयाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. परंतु या निधीवरच समाधान मानू नका, एकल विद्यापीठासाठी शासन संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, यासाठी लागणारा सर्व आवश्यक निधी देखील राज्य शासन उपलब्ध करुन देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
जिल्ह्यात उच्च शिक्षण देणारी विदर्भा ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये २८ जुलै १९२३ रोजी पहिल्या शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली होती. त्यामुळे संस्थेचे शताब्दी वर्ष यंदा साजरे होत असून, या महोत्सवाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, खा. नवनीत राणा, खा. रामदास तडस, आ. प्रवीण पोटे-पाटील, आ. सुलभा खोडके, आ. अशोक उईके, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यान्थन, संस्थेच्या संचालक डॉ. अंजली देशमुख, प्र. शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संस्थेचा इतिहास देदीप्यमान आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे अनेक महापुरुष याच महाविद्यालयात घडले. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी अनेक मोठी व्यक्तिमत्वे येथे घडली. माझ्या आईचेही शिक्षण याच संस्थेतून झाले. संस्थेच्या एकल विद्यापीठासाठी लागणाऱ्या सर्व बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संस्थेलाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा जाहीर झाले आहे. रिद्धपुर येथे मराठी विद्यापीठ तर लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचेही काम सुरु होत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याचा विकास शैक्षणिक हब म्हणून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हे लवचिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकता येईल. तसेच भारतीय भाषांमध्ये आता वैद्यकीय, अभियंत्रिकी शिक्षण घेता येणार असल्याचे मतही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केद्राच्या इमारतीचे उद्घाटन
विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण अमरावती केंद्राची नवीन प्रशासकीय इमारत व वसतिगृह इमारतीचे उद्घाटन देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशासकीय इमारतीमध्ये २०० विद्यार्थ्यांची क्षमता असणाऱ्या वातानुकूलित वर्ग खोल्या, अद्यायावत ग्रंथालय, कम्प्युटर हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल, ऑडिओ-व्हिडिओ हॉल, संचालक कक्ष तसेच कार्यालय अशा १४ कक्षांच्या समावेश आहे. तर वस्तीगुहामध्ये १२० मुला मुलींची राहण्याची व्यवस्था आहे.