जीवनावश्यक वस्तू, सेवांपासून कोणालाही वंचित ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:55+5:30
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरला भेट देऊन तेथील सेवा- सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा नियमित व्हावा, एकही व्यक्ती सुविधेपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरला भेट देऊन तेथील सेवा- सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणा, रुग्णालये, निवारा केंद्रे यांना भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. निवारा केंद्रांतील नागरिकांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. आरोग्य, महसूल व नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावाही त्यांनी घेतला. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासन विविध पावले उचलत आहे. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. स्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने काम करावे व इतरांचेही सहकार्य मिळवावे. आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी आहे. या काळात ते अविश्रांत सेवा बजावत आहेत, असे पालकमंत्री म्हणाल्या.
आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी युद्धस्तरावर सेवा देत आहे. क्वारंटाइन व्यक्ती, तपासणी स्थिती, रुग्णालय व आरोग्य सुविधा, निवारा केंद्रे आदी बाबींचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. दरम्यान, डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे पालकमंत्र्यांनी मनोबल वाढविले.
अधिकारी, कर्मचाºयांनी मुख्यालय सोडू नये
ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. ‘अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ हे अभियान प्रशासनाने सुरू केले आहे. त्यानुसार घरोघरी संपर्क करावा, जनजागृती करावी, ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी सांभाळावी, असे पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या.
निवारा केंद्रात सुविधांची उणीव नको
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सर्वांना वेळेत व्हावा, यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. केवळ जिल्ह्यातील स्थानिक नागरिकच नव्हे, तर या काळात जिल्ह्याबाहेरून आलेले, पण संचारबंदीमुळे अडकलेले अनेक नागरिक आहेत. त्यांच्यासाठी निवारा केंद्रे सुरू केली आहेत. त्यांची गैरसोय होता कामा नये, असे पालकमंत्री म्हणाल्या.