काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:43 AM2023-09-11T11:43:53+5:302023-09-11T11:45:54+5:30

खासदार-आमदार राणा दाम्पत्यांवर उधळली स्तुतीसुमने

Don't worry, the government is with you, says Dy CM Devendra Fadnavis | काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

googlenewsNext

अमरावती : गेल्या ७० वर्षांत अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी कधीही एवढा निधी मिळाला नाही तो आताच्या युती सरकारने दिला आहे. काळजी करू नका, कोणतेही विकासाचे काम थांबणार नाही. लोकांचे प्रेम तुमच्यावर आहे. सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे, अशी स्तुतीसुमने उधळत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार-आमदार राणा दाम्पत्यांच्या कार्याची दखल घेत कौतुक केले.

मंत्री फडणवीस हे रविवारी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित केलेल्या नवाथे चौक येथील दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित होते. श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी बंधुभावाने राहावे. सर्व जात, पात, धर्म विसरून दहीहंडीतील प्रेमाचा गोपालकाला एकमेकांना वाटून समाजात सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी येथे केले.

दहीहंडी कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह सिनेकलाकार शिल्पा शेट्टी, राजपाल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री फडणवीस यांनी मंचावरील दहीहंडी श्रीफळाने फोडून कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. छत्री तलाव येथे श्री हनुमानजी यांची १११ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या हस्ते त्या मूर्तीच्या प्रतिकृतीचे रिमोटद्वारे अनावरण करण्यात आले. हनुमान चालिसाचेही यावेळी पठण करण्यात आले. तसेच तिवसा व राऊर येथील निराधार कुटुंबांना घरकुल मंजूर झाले आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात घरकुलाचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात आला.

श्रीकृष्ण आणि अमरावतीचा प्राचीन काळापासूनचा संबंध आहे. श्रीकृष्ण हे अमरावतीचे जावई आहेत. 

श्रीकृष्णाच्या विचारसरणीप्रमाणे सर्व समाजबांधवांनी एकोप्याने राहावे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, अमरावती विमानतळाचा विकास, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. पीएम टेक्सटाईल पार्कअंतर्गत नव्या टेक्सटाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार असून, यातून तीन लाख तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. भाषेचे गौरवस्थळ मानल्या जाणाऱ्या रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय अर्थसंकल्पाद्वारे झाला आहे.

येथील शासकीय ज्ञान विज्ञान संस्था, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाचवेळी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ आणि दोन मोठ्या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणे, ही घटना अमरावतीच्या शिक्षण परंपरेला दृढ करणारी आहे. तसेच अमरावतीचे श्रद्धास्थान तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे स्मारक तयार करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अमरावतीचा सर्वांगीण विकासासाठी या निर्णयांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Don't worry, the government is with you, says Dy CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.