कोविड रुग्णांचे पुन्हा ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:40+5:302021-05-29T04:11:40+5:30
अमरावती : कोरोना संक्रमण ओसरत असले तरी कोविड रुग्णांचे ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या माध्यमातून कोविड ...
अमरावती : कोरोना संक्रमण ओसरत असले तरी कोविड रुग्णांचे ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या माध्यमातून कोविड रुग्णांवर लवकर उपचार केला जाईल. सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदांकडे सोपविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, कोरोनाचे संकट कायम आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा उपाययोजना करीत आहे. मात्र, नागरिकांनाच कोरोना नियमावलींचे पालन करावे लागेल. शासननिर्णयानुसार जिल्ह्यात संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार करताना रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शासकीय दरानुसार सीटी स्कॅनचे तीन हजार रुपये, तर एमआरआय सात हजार रुपये आकारले जाणार आहे. याशिवाय कोणी अतिरिक्त शुल्क आकारल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत २३ टक्के कोविड रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पुन्हा नव्या सर्वेक्षणातून कोविड रुग्णांची शहानिशा करण्यात येणार आहे. ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षणादरम्यान आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आराेग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नवाल यांनी स्पष्ट केले.
--------------------
लेखाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर कारवाई
कोरोना रुग्णांवर उपचार करताना अवाजवी दर आकारले जात असल्याप्रकरणी तीन रुग्णालयांसाठी एक लेखाधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४० पेक्षा जास्त कोविड रुग्णालयांना परवानगी देण्यात आली असून, लेखाधिकारी बिलाच अंकेक्षण करतील. लेखाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच जादा शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई निश्चित केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.