२१ दिवसांत आरटीई प्रवेशासाठी दुपटीने अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:08+5:302021-03-25T04:14:08+5:30
अमरावती : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार खासगी शाळांत २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या ...
अमरावती : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार खासगी शाळांत २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया गत ३ मार्चपासून सुरू झाली आहे. आरटीई प्रवेशासाठीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या २१ दिवसांत ५,३०९ पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश अर्ज दाखल केले आहेत.
जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता २४४ शाळांनी नोंदणी केलेली आहे. या शाळांत आरटीई प्रवेश प्रक्रियेकरिता २५ टक्क्यानुसार २०७६ जागा आहेत. या जागांवर प्रवेशाकरिता प्रवेशपात्र पाल्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी तीन आठवड्यांपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. बुधावार २४ मार्चपर्यंत प्रवेशासाठी पालकांचा अर्ज करण्यासाठीचा ओघ वाढला आहे. विशेष म्हणजे प्रवेश अर्जाची संख्या लक्षात घेता पालकांकडून प्रवेशासाठीची जागापेक्षा दुपटीहून अधिक अर्ज आले आहेत. अर्ज करण्यासाठी ३० मार्चची डेडलाईन असल्याने या अर्जसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बॉक्स
२४४ शाळा २०७६ जागा
आरटीई अंतर्गत जिल्ह्यात यंदा २४४ शाळांनी नोंदणी केलेली आहे. या शाळांत यावर्षीसाठी २ हजार ७६ रिक्त जागा आहेत. या जागाकरिता पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. विशेष म्हणजे यंदा गतवर्षीसारखाच अर्ज प्रक्रियेचा ओघ वाढताच आहे.