अमरावती जिल्ह्यात आढळला दुतोंड्या मांडूळ साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:36 PM2018-03-20T13:36:29+5:302018-03-20T13:36:39+5:30
नजीकच्या गौलखेडा कुंभी येथील एका नालीत सोमवारी सायंकाळी ६ वाजता दुतोंड्या (मांडूळ) साप आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नजीकच्या गौलखेडा कुंभी येथील एका नालीत सोमवारी सायंकाळी ६ वाजता दुतोंड्या (मांडूळ) साप आढळला. सर्पमित्र सुरमा भोपाली यांनी तो साप पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला.
सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत परिसरातील नागरिकांना दुतोंड्या साप दिसला. तो सर्वसामान्य साप असल्याच्या भीतीने नागरिकांनी तातडीने सर्पमित्र असलेले सुरमा भोपाली यांना दूरध्वनीवर संपर्क करून पाचारण केले. त्यांनी नालीतून साप बाहेर काढल्यानंतर मात्र नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. हा दुर्मीळ साप परतवाडा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांच्या स्वाधीन करण्यात आला.
परतवाडा-खंडवा या आंतरराज्यीय महामार्गावर गौलखेडा कुंभी हे गाव आहे. नालीतून बाहेर काढताच सापाने रस्त्यावर धाव घेतली. त्यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.सापाला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली.
कोट्यवधीचा साप
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सापासाठी कोट्यवधी रुपये मोजले जातात. त्यामुळे त्याचा शोध घेऊन तस्करीही होते. गत महिन्यात दयार्पूरनजीक वनविभाग आणि पोलिसांच्या पथकाने तस्करांना दुतोंड्या सापासमवेत पकडले होते. या सापासाठी अडीच कोटींची बोली लागली होती. या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती.
गौलखेडा कुंभी येथ सर्पमित्र सुरमा भोपाली यांनी दुतोंड्या साप पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला. वरिष्ठांना माहिती देऊन हा साप जंगलात सोडला जाईल.
- शंकर बारखडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा