महापालिकेतील अन्य देयकांवरही आता संशय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:01:00+5:30

महापालिका क्षेत्रातील दक्षिण प्रभाग क्रमांक ४, बडनेरा झोनमधील ४०० वर वैयक्तिक शौचालय बांधकामाचे ७४ लाख ८० हजारांच्या कामांच्या तीन नस्तीमधील सर्व अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व शिक्के त्यांचे नसल्याचे लेखी बयाण्यात स्पष्ट करण्यात आलेले आहे. याविषयीचे बयान प्रकरणात आयुक्तांद्वारा नियुक्त चौकशी अधिकारी विजयकुमार खोराटे यांच्याद्वारे घेण्यात आले व अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला.

Doubts over other payments in NMC now! | महापालिकेतील अन्य देयकांवरही आता संशय!

महापालिकेतील अन्य देयकांवरही आता संशय!

googlenewsNext
ठळक मुद्देवैयक्तिक शौचालय प्रकरण । बनावट नस्तीने प्रशासनाची पोलखोल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा झोनमधील ७७ लाखांच्या तीन बनावट देयकप्रकरणी दोघांविरुद्ध एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाने महापालिका प्रशासनाची पोलखोल केलेली आहे. याप्रकरणात आणखी काही बडे मासे गळाला लागणार की महापालिकेतील अन्य घोटाळ्यांप्रमाणे प्रकरणांवर पांघरून घातले जाणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
महापालिका क्षेत्रातील दक्षिण प्रभाग क्रमांक ४, बडनेरा झोनमधील ४०० वर वैयक्तिक शौचालय बांधकामाचे ७४ लाख ८० हजारांच्या कामांच्या तीन नस्तीमधील सर्व अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व शिक्के त्यांचे नसल्याचे लेखी बयाण्यात स्पष्ट करण्यात आलेले आहे. याविषयीचे बयान प्रकरणात आयुक्तांद्वारा नियुक्त चौकशी अधिकारी विजयकुमार खोराटे यांच्याद्वारे घेण्यात आले व अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला. याप्रकरणी शहर कोतवाली ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात आयुक्त व उपायुक्तांनी सजगता दाखविल्यामुळे ७५ लाखांचा अपहार होण्यापूर्वीच उघडकीस आला. महापालिकेत अशाही पद्धतीने देयक सादर केले जाते, ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे अन्य प्रकरणांत सादर करण्यात आलेल्या देयकांवर आता शंका व्यक्त केली जात आहे.
बडनेरात झोनमध्येच यापूर्वी अशाच कामांचे ५० लाखांचे देयक देण्यात आले तसेच महापालिका क्षेत्रातील उर्वरीत झोनमध्ये वैयक्तीक शौचालयाची किती कामे झालीत, त्यापोटी किती देयक देण्यात आले, कामे झाल्याचे दाखविले गेले का, यामध्ये बनावट कामे किती, त्यासाठी प्रशासनातील अधिकाºयांवर कोणाचा दबाव होता का, या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. अपहार कुठवर झिरपला, हे शोधण्यासाठी आयुक्तांद्वारे सर्व सहायक आयुक्तांना याविषयीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात मोठ्या आर्थिक संकटांना समोर जाणाºया महापालिकेला कोणी किती व कसा चुना लावला, हे येत्या काळात समोर येणार आहे.

अशा आहेत तीन बनावट नस्ती
बडनेरा झोनमध्ये प्रतिशौचालय १७ हजार याप्रमाणे देयके मंजूर करण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२० रोजी १६९ शौचालयांसाठी २८ लाख ७३ हजार रुपयांची पहिली नस्ती, २८ फेब्रुवारीला १४९ शौचालयांसाठी २५ लाख ३३ हजार ३ रुपयांची दुसरी नस्ती, तर २४ मार्चला १२२ शौचालयांसाठी २० लाख ७४ हजारांची तिसरी नस्ती अशा ४४० शौचालयासाठी ७४ लाख ८० हजारांच्या तीन नस्ती प्रक्रिया टाळून थेट आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात अपहार झालेला नाही, तर होण्यापूर्वी उघडकीस आला. मात्र, या प्रकरणामुळे आता सर्व झोननिहाय किती खर्च झालेला आहे, याविषयीची माहिती मागितली आहे. स्वत: लाभार्थींना खात्यात किती व कंत्राटदाराला किती रक्कम मिळाली, याविषयी आता उलटतपासणी करणे सुरू केले आहे. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता), मुख्य लेखाधिकारी यांच्याकडूनही माहिती मागितली आहे. यामध्ये काही तफावत आहे का, याची उलटतपासणी करण्यात येत आहे. यामध्ये दोषी सापडल्यास कारवाई करण्यात येईल.
- प्रशांत रोडे
आयुक्त, महापालिका.

बडनेरा झोनचे अधिकारी करतात तरी काय?
कंत्राटी लिपिक न झालेल्या कामांच्या तीन नस्ती तयार करतात. जावक क्रमांकासह सर्व काही नोंद होते. देयकामधील त्रुटी पूर्ततेसाठी हाच लिपिक ७५ लाखांचे देयक स्वत:कडे ठेवतो. लेखा विभागातील लिपिकाच्या सहकार्याने पुन्हा सादर करतो. या सर्व प्रकारात बडनेरा झोनमधील जबाबदार अधिकारी काय करीत होते, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. यापूर्वीदेखील या कंत्राटी लिपिकाने अनेक महत्त्वाच्या फायली हाताळल्या असल्याने महापालिकेत कारभार कसा चालतो, हे समोर आले आहे.
 

Web Title: Doubts over other payments in NMC now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.