डझनभर हेल्थ अँड वेलनेस सेंटर कागदोपत्रीच; डेडलाइन हुकली!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 06:16 PM2022-12-16T18:16:57+5:302022-12-16T18:17:05+5:30
शहरात १२ विविध ठिकाणी १५ डिसेंबरपासून महापालिकेचे हेल्थ अँड वेलनेस सेंटर ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ सुरू होणार असल्याचा दावा मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आला होता.
अमरावती :
शहरात १२ विविध ठिकाणी १५ डिसेंबरपासून महापालिकेचे हेल्थ अँड वेलनेस सेंटर ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ सुरू होणार असल्याचा दावा मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आला होता. त्याअनुषंगाने १६ डिसेंबर रोजी त्या ठिकाणांची पाहणी केली असता एकाही ठिकाणचे हेल्थ अँड वेलनेस सेंटर कार्यान्वित झाले नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेचा तो दावा खोटा ठरला आहे. विशेष म्हणजे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी अधिनस्थ यंत्रणेला १५ डिसेंबरची डेडलाइन दिली होती. प्रत्यक्षात चार ते पाच ठिकाणी केवळ प्राथमिक बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये हृदयरोग, मधुमेह असलेल्या रुग्णांची तपासणी, औषधोपचार, आहाराबाबत सल्ला तसेच व्यायाम याबाबत तर मार्गदर्शन केले जाईल. शिवाय साथरोग, महिलांचे आजार याबाबत मार्गदर्शन, उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे मनपाच्या दवाखान्यांसोबतच आता उपचारासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा नवा पर्याय शहरवासीयांना उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा व आ. सुलभा खोडके यांच्या हस्ते त्या केंद्राचे दोन आठवड्यांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते.
२.५८ कोटींचा निधी
आयुष्मान भारत योजनेंतर्गत मनपाला १२ हेल्थ अँड वेलनेस सेंटर उभारण्याची परवानगी मिळाली. प्रत्येक दवाखान्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी २१.५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातून मनपाला त्यासाठी एकूण २ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्या ठिकाणी एक डाॅक्टर, एक स्टाफ नर्स, मल्टिपर्पज वर्कर (एमपीडब्ल्यू), आशा सेविका आणि अटेंडंट असे ५ व एकूण ६० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये काय ?
गरोदरपणा आणि बाळंतपणातील काळजी, नवजात शिशू आरोग्य सेवा, बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींसाठी आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक आणि इतर प्रजनन आरोग्य सेवा, साथरोगांसंबंधी सेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, लहान आजारांसाठी बाह्यरुग्ण सेवा, असंसर्गजन्य रोगांसाठी स्क्रीनिंग, प्रतिबंधात्मक, नियंत्रण आणि उपचार सेवा, सामान्य नेत्र आणि कान-नाक-घसा यांचे आजारांसंबंधी सेवा, मूलभूत मौखिक आरोग्य सेवा, वृद्ध आणि उपशामक आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मूलभूत मानसिक विकारांसाठी स्क्रीनिंग आणि प्राथमिक उपचार सेवा, योगा आणि इतर आयुष सेवा.
येथे बनणार हेल्थ अँड वेलनेस सेंटर
झोन क्रं. १ मध्ये नवसारी गावठाण- मनपा शाळा, रहाटगावचा दवाखाना पूर्ण वेळ, राधा नगर, गाडगे नगर (प्रगती शाळा),
झोन क्रमांक २ : अंबिका नगर, मनपा शाळा, रुक्मिणी नगर, मराठी शाळा नं. १९, बजरंग प्लॉट, शाळा नं. ८, शारदा नगर, पन्नालाल बगीचामधील एक हॉल, झोन क्रं. ३ मध्ये शुक्रवार बाजारातील एक हॉल, चपराशीपुरा उर्दू मनपा शाळा नं. ६, झोन क्रं. चारमध्ये अकोलीमध्ये एक खोली, मनपा शाळा नं. २४ बडनेरा, माया नगर.