स्मार्टसिटीसाठी १६१७ कोटींचा ‘डीपीआर’
By admin | Published: March 21, 2017 12:14 AM2017-03-21T00:14:55+5:302017-03-21T00:14:55+5:30
केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीसाठी अमरावती महापालिकेने १६१७ कोटींच्या प्रस्तावावर सोमवारी अंतिम शिक्कामोर्तब केले.
तीन घटकांचा समावेश: पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण
अमरावती : केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीसाठी अमरावती महापालिकेने १६१७ कोटींच्या प्रस्तावावर सोमवारी अंतिम शिक्कामोर्तब केले. यात ग्रीनफिल्डसह पॅनसिटी आणि रेट्रोफिटींग या तीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हा संपुर्ण प्रस्ताव मंगळवार किंवा बुधवारी राज्यशासनाकडे सुपूर्द केला जाईल.
आलिया कंन्सलटंसीने दिलेल्या प्रस्तावावर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसह आ.सुनिल देशमुख यांच्यासह उपमहापौर, पक्षनेते, स्थायी समितीचे सभापती व अन्य सदस्यांसमोर चर्चा करण्यात आली. यथा सादरीकरण करण्यात आले. स्मार्ट सिटीचा पहिला प्रस्ताव ५५०० कोटी, दुसरा प्रस्ताव २२६८ कोटींचा तर हा तिसरा प्रस्ताव केवळ १६१७ कोटींचा करण्यात आला आहे. वडद येथिल ज्या भूधारकांनी लेखी संमती दिली त्यांच्या ८३ एकर जमिनीचा ग्रीनफिल्ड अंतर्गत घटकान्वये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय छत्रीतलावालगतच्या ५५ ्एकर क्षेत्राचा यात समावेश करण्यात आल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. अॅग्रोटेक बिझनेस डिस्ट्रीक्ट म्हणून यात शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी विविध विकासात्मक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. रेट्रोफिटींगमध्ये एकूण ६५५ एकर क्षेत्र घतल्या गेले असून त्यावर अंदाजे ७०३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात यशोदानगर आणि रुख्मिनेनगर भागाचा समावे करण्यात आा आहे. तर पॅनसिटीमध्ये सीसीटीव्ही आणि अन्य भटकांचा समावेश करण्यात आला आहे. तर ग्रीनफिल्डमध्ये ट्रान्सपोर्टहब, एक्झीब्यूशन बिल्डिंग सह टाऊनसिटीचा समावेश आहे. यानंतरही वडद येथील जे भूधारक त्यांच्या जमिनीसंदर्भात लेखी संमती देतील, अशांच्या जमिनींचा अंतर्भाव प्रस्तावाच्या टप्पा दोनमध्ये करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
‘आलिया’ला खडसावले
स्मार्ट सिटीचा डीपीआर बनविण्याचे कंत्राट मुंबई स्थित आलिया कन्सल्टन्सीला देण्यात आले. मात्र, पहिल्या दोन प्रस्तावाप्रमाणे आताच्या तिसऱ्या प्रस्तावातही आलियाच्या वतीने कुठलाही पुढाकार घेण्यात आला नाही. हँडहोल्डिंग एजन्सीसह आयुक्त हेमंत पवार आणि त्यांच्या यंत्रणेने डीपीआरवर अंतिम शिक्कामोर्तब केले. आयुक्तांनी सोमवारी सादरीकरणादरम्यान आलियाच्या प्रतिनिधीची तिखट शब्दात खरडपट्टी काढली.
स्मार्टसिटी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीसाठी १६१७ कोटींच्या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले असून, बुधवारी हा प्रस्ताव राज्यशासनाकडे सुपूर्द करण्यात येईल. प्रस्ताव वस्तुस्थितीदर्शक आहे.
- हेमंतकुमार पवार
आयुक्त, महापालिका