डॉ. आंबेडकर स्मारकाच्या जागेसाठी ६० लाखांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2016 01:08 AM2016-03-02T01:08:13+5:302016-03-02T01:08:13+5:30
येथील इर्विन चौक स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण जागा अधिग्रहणासाठी १२ नगरसेवकांनी प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे ६० लाख रुपयांचा निधी देण्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे.
दंदे यांचा पुढाकार : १२ नगरसेवकांचे निधीसाठी पत्र
अमरावती : येथील इर्विन चौक स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण जागा अधिग्रहणासाठी १२ नगरसेवकांनी प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे ६० लाख रुपयांचा निधी देण्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे जागा अधिग्रहणातील अडसर दूर झाले आहे. यासाठी नगरसेवक प्रदीप दंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांना दिलेल्या पत्रानुसार इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरालगत गट्टाणी यांच्या मालकीची खासगी जागा अधिग्रहणासाठी महापालिकेने पत्र पाठविले आहे. जागा अधिग्रहणासाठी ३.३४ कोटी रुपये लागणार असून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एक कोटी रुपयांचा धनादेश जमा करण्यात आला आहे. यापूर्वी मातोश्री सूर्यकांता देवी पोटे यांच्या नावाने २५ लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी रुपयांचे नियोजन करण्याबाबत जाहीर करण्यात आले होते. यावर्षी डॉ. आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या जयंती पर्वाचे औचित्य साधून स्मारक जागेसाठी निधीची उणिवा भासू नये, यासाठी १२ नगरसेवकांनी डीपीसीतून मिळणारे प्रत्येकी पाच लाखांचा निधी जागा अधिग्रहणासाठी घेण्याबाबत पत्र दिले आहे. ही जागा मार्चपूर्वी अधिग्रहीत करण्यात आली नाही तर त्यानंतर जागेचे रेडिरेकनर नुसार भाव वाढेल. जागा अधिग्रहणाची प्रक्रिया करून स्मारक निर्मितीचा मार्ग सुकर करावा, असे नगरसेवक दंदे यांनी पत्रात नमूद केले आहे. स्मारक निर्मितीसाठी पालकमंत्र्यांनी १ कोटी २१ लाख रुपये जाहीर करून जागा अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)