‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीत योगदान’ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:12 AM2020-12-06T04:12:51+5:302020-12-06T04:12:51+5:30
विद्वत परिषदेत निर्णय, बी.ए. (इतिहास) चे विद्यार्थी गिरविणार धडे, महामानवाच्या कायार्चा व्यापक परिचय अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ...
विद्वत परिषदेत निर्णय, बी.ए. (इतिहास) चे विद्यार्थी गिरविणार धडे, महामानवाच्या कायार्चा व्यापक परिचय
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. (इतिहास) अभ्यासक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीत योगदान’ या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन विदवत परिषदेच्या सभेत याअनुषंगाने निर्णय घेण्यात आला. विद्यापीठात पहिल्यांदाच पदवी अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शिकविले जाणार आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास मंडळाने बी.ए. भाग १, २ व ३ च्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यासाठी १४ फेब्रुवारी २०२० रोजी अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेतील सहभागी प्राध्यापकांनी अभ्यासक्रमात सुचविलेले बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रम बदल समितीची स्थापना करण्यात आली. या अभ्यासक्रमांची मांडणी अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या बैठकीत २ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष संतोष बनसोड यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदान व भारताच्या स्वातंत्र्याची १९४५ ची योजना’ या घटकाचा सर्वानुमते करण्यात आला. मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या १० सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत या विषयाला मान्यता प्रदान करण्यात आली.
-----------------------
विद्या परिषदेत शुक्रवारी शिक्कामोर्तब
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ४ डिसेंबर रोजी विद्या परिषदेची ऑनलाईन बैठक घेतली. यात सदस्यांनी चर्चा करून बी.ए. भाग २ सत्र ४ च्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रविषयक कार्य व त्यांची १९४५ ची स्वातंत्र्याची योजना’ हा घटक समाविष्ट करण्याचा निर्णय सवार्नुमते घेतला.
-------------------
कोट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवमुक्तिदाते होते. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी बी.ए. इतिहास अभ्यासक्रमात ‘डॉ.आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीत योगदान’ हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. हीच खरी त्यांना महापरिनिर्वाण दिनी आदरांजली ठरेल.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.
--------------------
कोट
घटनाकार व अस्पृश्योद्धारक एवढ्याच मर्यादित स्वरूपात न ठेवता डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान विद्यार्थी व समाजासमोर येणे गरजेचे होते. म्हणून विद्या परिषदेने हा निर्णय घेतला आहे.
- संतोष बनसोड, अध्यक्ष, इतिहास मंडळ, अमरावती विद्यापीठ.