डॉ. दिलीप मालखेडे अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:59+5:302021-09-12T04:15:59+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली पाच वर्षांसाठी नियुक्ती (फोटो ११ एएमपीएच ०१) अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली पाच वर्षांसाठी नियुक्ती (फोटो ११ एएमपीएच ०१)
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी पाच वर्षांसाठी नियुक्ती केली. तब्बल १५ वर्षांनंतर विद्यापीठाला डॉ. मालखेडे यांच्या रूपाने भूमिपुत्र सर्वोच्च पदावर लाभला आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त डॉ. दिलीप मालखेडे हे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक आणि सध्या दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार-१ या पदावर प्रतिनियुक्तीवर आहेत. माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. डॉ. मालखेडे हे पुढील आठवड्यात पदभार स्वीकारतील, अशी माहिती आहे.
----------------
१५ वर्षांनंतर लाभला भूमिपुत्र
वरूड येथील डाॅ. सुधीर पाटील हे २००५ मध्ये कुलगुरू होते. त्यानंतर आता २०२१ मध्ये भूमिपुत्र म्हणून डॉ. दिलीप मालखेडे यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. अमरावती जिल्ह्याच्या चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव हे त्यांचे मूळ गाव. बारावीपर्यंत शिक्षणही येथेच घेतले. आजही त्यांचे आप्त याच गावात वास्तव्यास आहेत, तर त्यांचे आई-वडील अमरावती येथील मालटेकडीनजीक सर्वोदय कॉलनीत राहतात.
----------------
असा घडला अध्ययन-अध्यापनाचा प्रवास
अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी पदवी घेतली आणि काही काळ येथेच नोकरीही केली. अमरावती येथूनच एम.टेक. पूर्ण केले. आयआयटी पवई येथून पीएचडी केले. औरंगाबाद येथील बजाज कंपनीत नोकरीही केली. यानंतर ते कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथून दिल्ली येथील एआयसीटीई येथे नियुक्ती झाली. आता अमरावती विद्यापीठाचे कुलगुरुपदी पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती झाली आहे.