"भाऊसाहेबांची १२५ वी जयंती शासनस्तरावर साजरी करणार"
By उज्वल भालेकर | Published: April 10, 2023 05:04 PM2023-04-10T17:04:59+5:302023-04-10T17:05:56+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पीडीएमसीतील अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन
अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य हे दीपस्तंभासारखे आहे. शिक्षणक्षेत्रामध्ये महाराष्ट्राने जी प्रगती केली आणि सातत्याने साक्षरतेच्या प्रमाणात राज्य पुढे गेला असून, याचे श्रेय डॉ. पंजाबराव देशमुखांना दिले पाहिजे. भाऊसाहेब हे दूरर्शी व द्रष्टे होते. त्यांनी समाजाला शिक्षणाची दिशा दिली. अशा या भाऊसाहेबांची १२५ वी जयंती ही राज्य शासनस्तरावर साजरी करेल असे मत उपमुखमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकिय महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे होते. तसेच कार्यक्रमाला खा. अनिल बोंडे, खा. नवनीत राणा, आ.सुलभा खोडके, आ. प्रवीण पोटे पाटील, आ. परिणय फुके, आ. श्वेता महाले, आ. प्रा.अशोक उईके, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलिपबाबू ईंगोले, संदीप जोशी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र व बालरोग विभागाची नवीन वार्ड इमारत आणि आकस्मिक दक्षता कक्षाचे उद्घाटन केले. यानंतर मुख्य कार्यक्रमात ते म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलीत, शेतकरी, शेतमजुर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील. तसेच भाऊसाहेबांनी दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरवून कृषी व संलग्न क्षेत्रांना विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणल्याचे मत व्यक्त करत, भाऊसाहेबांच्या जन्मस्थळ येथे कृषी महाविद्यालय निर्माण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे तसेच संस्थेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. किशोर फुले यांनी केले.