डॉ.पंजाबराव देशमुख बँकेच्या अध्यक्षांचा आत्मघात, वर्धा शाखेतील गैरव्यवहाराने हतप्रभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 08:06 PM2017-09-21T20:06:50+5:302017-09-21T20:07:54+5:30

वर्धा येथील शाखेमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहाराने हतप्रभ झालेले डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को.आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी येथील हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

Dr. Panjabrao Deshmukh's head of the party's suicide, due to misbehavior in Wardha branch, inauspicious | डॉ.पंजाबराव देशमुख बँकेच्या अध्यक्षांचा आत्मघात, वर्धा शाखेतील गैरव्यवहाराने हतप्रभ

डॉ.पंजाबराव देशमुख बँकेच्या अध्यक्षांचा आत्मघात, वर्धा शाखेतील गैरव्यवहाराने हतप्रभ

Next

अमरावती, दि.21 - वर्धा येथील शाखेमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहाराने हतप्रभ झालेले डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को.आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी येथील हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. शेजारच्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह बुधवारी रात्री ११ वाजता आढळून आला होता. मात्र, सोमवारच्या रात्रीच त्यांनी गळफास घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
       अत्यंत सचोटी आणि प्रामाणिकतेने बँकेला यशोशिखराकडे घेऊन जात असताना वर्धा येथील शाखेमध्ये ९.८१ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याने वानखडे अस्वस्थ होते. त्यातून त्यांनी आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारल्याचा दावा गुरूवारी बँकेचे उपाध्यक्ष व संचालक मंडळाकडून करण्यात आला. बँकेच्या वर्धा शाखेतील गैरव्यवहाराचा उल्लेख वानखडे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीतही केला आहे. या गैरव्यवहारामुळे स्वत:च्या स्वच्छ कारकिर्दीला डाग लागू शकतो, याची जाणिव झाल्याने त्यांनी  आत्मघाताचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजय वानखडे अविवाहित होते. ते येथील समर्थ कॉलनीत भावासोबत राहत होते. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वानखडे यांचे शेजारी दिलीप ठाकरे यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती समर्थ कॉलनीतील नागरिकांनी राजापेठ पोलिसांना दिली. माहिती मिळताच राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी व वाहतूक शाखेचे अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता गळफास घेतलेल्या अवस्थेतील अत्यंत कुजलेला मृतदेह  दिसून आला. तो मृतदेह पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅप. बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सहकार वर्तुळात खळबळ उडाली. सहकारक्षेत्रातील जाणता हरविल्याच्या संवेदना जाणकारांनी व्यक्त केल्यात. 
एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून प्रख्यात वानखडे यांनी आत्मघातका केला, या सगळ्यांनाच भेडसावणाºया प्रश्नाची उकल त्यांच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीमुळे झाली. ‘माझ्या आत्महत्येसाठी कुणीही जबाबदार नसून, मी स्वमर्जीने स्वत:ला संपवित आहे’ असे त्यांच्या चिठ्ठीत नमूद आहे. अत्यंत विपरीत स्थितीतून बँकेला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न यशस्वी होत असतानाच काही व्यक्तींच्या भ्रष्टाचारामुळे आपल्याला अतिव दु:ख होत आहे. त्यामुळे उद्विग्न झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे वानखडे यांनी त्यांच्या भावाला उद्देशून मृत्यूपूर्वी  लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. 
७ ते ८ वर्षांपूर्वी डॉ.पंजाबराव देशमुख बँकेची आर्थिक दुरवस्था झाली होती. त्यावेळी वानखडे यांनी एकहाती किल्ला लढवून बँकेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली होती. त्यांच्याच अध्यक्षतेखाली बँकेने भरभराट अनुभवली. मात्र, बँकेच्या वर्धा येथील शाखेमध्ये ९.८१ कोटींचा गैरव्यवहार झाल्याने ते प्रचंड अस्वस्थ झाले. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॅकिंगक्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तत्पूर्वी त्यांचा मृतदेह इर्विनचौक स्थित बँकेच्या मुख्य कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

संचालक मंडळाचा सावध पवित्रा... 
बँकेच्या वर्धा शाखेतील आर्थिक गैरव्यवहाराची बाब संजय वानखडे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होेती. अत्यंत संवेदनशील असलेले वानखडे हा धक्का पचवू शकले नाहीत. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष संजय खडसे यांनी गुरूवारी आयोजित पत्रपरिषदेतून दिली. संजय वानखडे यांनीे बँकेतील गैरव्यवहारामुळे आत्महत्या केली असली तरी त्या गैरव्यवहाराला संबधित शाखा व्यवस्थापक, वर्धा येथिल कैलास काकडे व  ४० अन्य कर्जदार कारणीभूत आहेत. त्यात संचालक मंडळाचा कुठलाही दोष नसल्याचा दावाही पत्रपरिषदेतून करण्यात आला. लेखापरीक्षणात वर्धा शाखेतील ९.८१ कोटींची आर्थिक अनियमितता उघड झाली. मात्र, संपूर्ण संचालक मंडळ त्या व्यवहारापासून अनभिज्ञ असल्याचा दावा तज्ज्ञसंचालक प्रवीण पाटील यांनी केला. यागैरव्यवहाराबाबत वर्धा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Web Title: Dr. Panjabrao Deshmukh's head of the party's suicide, due to misbehavior in Wardha branch, inauspicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.