मशिदीवरील भोंगे खाली उतरवू देणार नाही; रिपाईंचे भीमसैनिक संरक्षण देणार, राजेंद्र गवईंचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 06:24 PM2022-04-30T18:24:55+5:302022-04-30T18:43:04+5:30
काही समाज कंटकांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा प्रयत्न केल्यास भीमसैनिक हाणून पाडतील, अल्पसंख्याक बांधवांना शांतता राखण्यासाठी भीमसैनिक मदत करतील, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.
अमरावती : राज्यात कोणत्याही मशिदीवरील भोंगे खाली उतरणार नाही. काही समाजकंटकांनी तसा प्रयत्न केल्यास आपण ते हाणून पाडू, असा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ ईंडिया (गवई गट) राष्ट्रीय सरचटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी शनिवारी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
डा. गवई यांच्या मते, अमरावती लाेकसभा मतदार संघातून गवई कुटुंब गत पाच दशकापासून निवडणूक लढवितआहे. आम्हाला अल्पसंख्याक मतदारांनी भरभरून प्रेम दिले आहे. मात्र, आजमितीला मशिदीवरील भोंगे काढणे आणि हनुमान चालिसा पठण करणे यावरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. रिपाईं हा पक्ष भारतीय संविधानावर विश्वास ठेवतो. या देशात समाज, धर्म कोणताही असो, तो गुण्यागोविंदाने राहिला पाहिजे. त्याचे अधिकार त्याला मिळावे, हीच भावना आहे. मात्र, काही समाज कंटकांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा प्रयत्न केल्यास भीमसैनिक हाणून पाडतील, अल्पसंख्याक बांधवांना शांतता राखण्यासाठी भीमसैनिक मदत करतील, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले. भोंग्यासाठी सर्वानाच सारखे नियम आहेत. परंतु भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी गृह विभागाने मिरवणुकीबाबत योग्य प्रतिसाद दिला, ही खंत देखील डॉ, गवई यांनी व्यक्त केली.
मनसेच्या ‘त्या’ मतास विरोध
मुंबई येथे २५ एप्रिल रोजी गृह विभागाने सर्व पक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यासह मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन प्रभू देसाई मी देखील उपस्थित होतो. यावेळी राज ठाकरे यांनी भूमिका बदलावी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारला मदत करावी, असे मत नोंदविले. मात्र, माझ्या मतास मनसेने विरोध दर्शविला आणि ३ मे रोजी मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा निर्धार दर्शविला. मात्र, भीमसैनिक भोंगे कदापीही उरवू देणार नाही, असा ठाम निर्धार डॉ. राजेंद्र गवई यांनी घेतला आहे.