पाणीपुरवठ्याच्या पाण्यावर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 01:23 AM2019-04-11T01:23:38+5:302019-04-11T01:27:14+5:30
पाणीटंचाईचे स्वरूप उग्र होत असताना बेनोडा येथे पाणीपुरवठ्याच्या पाइपवरून संत्रा जगविण्याचा प्रकार उघडकीस आला. दोन वर्षांत १ कोटी ४४ लाख लिटर पेयजलावर डल्ला मारला. या पाणीचोरीची अखेर ९ एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बेनोडा (शहीद) : पाणीटंचाईचे स्वरूप उग्र होत असताना बेनोडा येथे पाणीपुरवठ्याच्या पाइपवरून संत्रा जगविण्याचा प्रकार उघडकीस आला. दोन वर्षांत १ कोटी ४४ लाख लिटर पेयजलावर डल्ला मारला. या पाणीचोरीची अखेर ९ एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली.
बेनोडा येथे किसना वानखडे नामक संत्राउत्पादक शेतकरी संत्राझाडे जगवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी शेतातून टाकलेल्या ग्रामपंचायतच्या पाइप लाइनला छिद्र पाडून पाणी पळवत होता. यामुळे गावाला कमी दाबाने पाणीपुरवठा व्हायचा. चहुबाजूला तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवत असताना या शेतात हिरवळ होती. त्यामुळे सरपंच विमल भलावी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नरेंद्र यावले, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह मनोज इंगोले, नरेंद्र रामचंद्र यावले, रोशन लाड, सतीश वानखडे, वासुदेव इंगोले, विजय पोटोडे आदी नागरिकांनी पाइप लाइनची पाहणी ५ एप्रिल रोजी केली. ग्रामपंचायतच्या १११ मिमी व्यासाच्या पाणीपुरवठा पाइप लाइनला ठिबकच्या १६ मिमीच्या सहा नळ्या लावून ते पाणी संत्राबागेत ड्रिपद्वारे दोन विहिरी आणि ड्रिपच्या सर्व चारही सर्कीटमध्ये वळते केले होते. यासंदर्भात कारवाईची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती.
अखेर ९ एप्रिल रोजी ग्रामविकास अधिकारी विनोद लोखंडे यांनी बेनोडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी किसना वानखडे (५८) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९ व सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम १९८४ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केल्याचे ठाणेदार सुनील पाटील यांनी सांगितले. पुढील तपास पीएसआय वाळके, हेडकॉन्स्टेबल राजू धुर्वे व साहेबराव राजस करीत आहेत.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांत तक्रार द्यावी की दंड आकारावा, यासंदर्भात खल सुरू होता. अखेर ग्रामविकास अधिकारी लोखंडे यांनी मंगळवारी तक्रार दाखल केली. प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या सहभागाच्या चर्चेला गुन्हा दाखल होताच विराम लागला.